विनापरवाना २०० रुग्णालयांना नोटिसा
By Admin | Updated: June 10, 2015 00:46 IST2015-06-10T00:40:43+5:302015-06-10T00:46:53+5:30
रूग्णांची विमा सेवा रखडली : आग प्रतिबंधक निकष पूर्ण नाहीत

विनापरवाना २०० रुग्णालयांना नोटिसा
कोल्हापूर : रुग्णालयांसाठी आवश्यक १३ कलमी आग प्रतिबंधक (फायर सेफ्टी) निकषांची पूर्तता न केल्याने शहरातील तब्बल २००हून अधिक रुग्णालयांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी नोटीस बजावली. निकषांची पूर्तता करून परवान्याचे तत्काळ नूतनीकरण करण्याचे आवाहन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी केले आहे. शहरातील ३८८ पैकी फक्त ६० रुग्णालयांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले आहे. परिणामी, विनापरवाना ठरलेल्या या रुग्णालयांत सेवा घेतल्यानंतर वैद्यकीय विम्याचा लाभ मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
केंद्र सरकारने सर्वच रुग्णालयांसाठी ‘फायर सेफ्टी’चे निकष अनिवार्य केले. या निकषांची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयांचा दर तीन वर्षांनी होणारा नूतनीकरण परवाना देऊ नये, असे स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांत जुन्या रुग्णालयांना याची पूर्तता करणे शक्य नसल्याने शहरातील ३०० हून अधिक रुग्णालयापुढील अडचणी वाढल्या आहेत. शहरात असलेल्या ४५० रुग्णालयांपैकी १९७ रुग्णालयांनी परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र यामध्ये त्रुटी असल्याने या रुग्णालयांचे परवाने रखडले आहेत; तर २००हून अधिक रुग्णालये परवान्यासाठी महापालिकेकडे फिरकलेच नाहीत. अशा सर्व रुग्णालयांना नोटिसा लागू केल्या आहेत. यानंतरही परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया न करणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईची पावले उचलली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
नव्या अटी जाचक : रूग्णालये
निकषांची पूर्तता न करणाऱ्या रुग्णालयाची नव्याने नोंदणी न करता परवानाच रद्द के ला जाणार आहे. आरोग्य विभागाने या सर्व रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या नव्या अटी अव्यवहार्य व जाचक असल्याने पूर्तता अशक्य असल्याचे या रुग्णालयांचे म्हणणे आहे; तर वास्तवाचे भान ठेवून रुग्णालयांनी परवाना नूतनीकरण करणे गरजेचे आहे. परवाना नसल्याने अशा रुग्णालयांतून विमा संरक्षण मिळणे बंद झाल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लगात असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
‘फायर सेफ्टी’तील अडचणीचे निकष
रुग्णालयात प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग, स्मोक डिटेक्टर, ड्राय रायझर, हाऊस रोल, वेट रायझर बसविणे, तसेच रुग्णालयामध्ये ५० हजारांची पाण्याची भूमिगत टाकी तसेच टेरेसवर १५ हजारांची पाण्याची टाकी असावी, आदी फायर सेफ्टीचे निकष अडचणीचे ठरत आहेत.
१९७ रुग्णालयांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे. मात्र, घरफाळा, पाणीपुरवठा विभाग, पार्किंग, आदी अटींच्या पूर्तता केलेल्या नाहीत. आतापर्यंत फक्त ६० रुग्णालयांनीच ‘फायर सेफ्टी’च्या निकषांची पूर्तता केली आहे. उर्वरित रुग्णालयांना नोटीस पाठविली आहे.
- डॉ. दिलीप पाटील
(मुख्य आरोग्य अधिकारी)