मैत्रीपूर्ण लढती नव्हे; जीवघेणा संघर्ष!

By Admin | Updated: August 26, 2014 21:51 IST2014-08-26T20:56:03+5:302014-08-26T21:51:04+5:30

विधानसभा निवडणूक : दोन्ही काँग्रेसमधील राजकीय वैमनस्य चिघळणार

Not a friendly fight; Fatal struggle! | मैत्रीपूर्ण लढती नव्हे; जीवघेणा संघर्ष!

मैत्रीपूर्ण लढती नव्हे; जीवघेणा संघर्ष!

सातारा : पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू असलेली गळती रोखण्यासाठी मैत्रीपूर्ण लढती होऊ द्या, अशी मागणी काँग्रेसच्या पाचही जिल्हाध्यक्षांनी केल्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू आहे. लढती झाल्याच तर सातारा जिल्ह्यात होणाऱ्या लढती मैत्रीपूर्ण होणार की त्या जीवघेणा राजकीय संघर्ष ठरणार, याकडेच अनेकांच्या नजरा आहेत.
सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेच असणार. मात्र, त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी आमदार सदाशिव सपकाळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतीच त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर टीकाही केली होती.
कोरेगावातील लढत सर्वांत लक्षवेधी ठरणार आहे. येथील लढत राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे विरुध्द काँग्रेस अशीच राहणार आहे. काँग्रेसकडून विजय कणसे, किरण बर्गे, खटावचे डॉ. सुरेश जाधव तयारच आहेत. किरण बर्गे शांत असले तरी कणसेंनी शड्डूच ठोकला आहे. संतोष जाधव गेल्या वेळी सेनेकडून लढले होते; मात्र त्यांनी काँग्रेसला जवळ केले.
डी. एम. बावळेकर यांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे आणि मदन भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगल्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण, याचा शोध काँग्रेसला घ्यावा लागणार आहे. मदन भोसले यांनी आघाडीकडून लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे काँग्रेसची आणखी गोची झाली आहे.
माणमध्ये लढत सर्वाधिक रंगतदार होणार असून, येथून जयकुमार गोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या असंख्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. आ. प्रभाकर घार्गे, माजी आ. सदाशिवराव पोळ, जिल्ह परिषद सदस्य अनिल देसाई, कविता म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीकडे दावा केला आहे. जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविलेल्या रणजितसिंह देशमुख यांनी मात्र काँग्रेसकडे पाठ केली आहे. सुरेंद्र गुदगे शांतच आहेत.
फलटणमध्ये रामराजे सांगतील तोच उमेदवार असेल.आ. दीपक चव्हाण, नंदू मोरे, डॉ. सतीश बाबर, सुधीर अहिवळे, बापूराव जगताप, सुधीर तानाजी अहिवळे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्काँग्रेसकडून दिगंबर आगवणे हेच उमेदवार राहणार आहेत.
कऱ्हाड दक्षिणमध्ये सध्या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विलासराव पाटील उंडाळकर व डॉ़ अतुल भोसले यांच्यातच स्पर्धा आहे.काल परवा मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर असणारे राजेश पाटील वाठारकर किंवा नगरसेवक सुभाष पाटील राष्ट्रवादी चे उमेदवार ठरू शकतात़
‘कऱ्हाड उत्तर’मध्ये अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील ़ स्वतंत्र लढल्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मतदार संघात सुमारे १५० कोटी रूपयांची विकास कामे करून घेणारे धैर्यशिल कदम चांगलेच आव्हान उभे करू शकतात़
पाटणमध्ये राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकर किंवा पूत्र सत्याजित पाटणकर हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, यात शंका नाही़ काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संधान साधून असणारे शिवसेनेचे माजी आमदार शंभूराज देसाई आता मोदी लाटेवर स्वार झाले आहेत़ त्यामुळे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील किं वा मुख्यमंत्र्यांचे पुतणे राहुल चव्हाण येथून निवडणूक लढवू शकतात.
दोन्ही काँग्रेसच्या लढतीत तिसऱ्याचा लाभ होईल अशी परिस्थती बहुतांश मतदारसंघामध्ये सध्यातरी दिसत नाही़ पण दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढतील यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा सध्यातरी विश्वास बसत
नाही़ (प्रतिनिधी)

सर्वाधिक संघर्ष कुठे..?
दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्याच तर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वात मोठा संघर्ष माण, फलटण, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदारसंघात होणार आहे.

Web Title: Not a friendly fight; Fatal struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.