Satara: ..आता नवीन नंबर प्लेट शिवाय जुन्या गाड्यांचे व्यवहार विसरून जा!

By प्रमोद सुकरे | Updated: June 16, 2025 11:45 IST2025-06-16T11:45:25+5:302025-06-16T11:45:39+5:30

परिवहन कार्यालयाचे परिपत्रक : आज सोमवारपासून त्याची अंमलबजावणी  सुरू झाली 

No transactions will be made for old vehicles without HSRP number plates in karad | Satara: ..आता नवीन नंबर प्लेट शिवाय जुन्या गाड्यांचे व्यवहार विसरून जा!

Satara: ..आता नवीन नंबर प्लेट शिवाय जुन्या गाड्यांचे व्यवहार विसरून जा!

प्रमोद सुकरे 

कऱ्हाड: सर्व वाहनांना एकाच पद्धतीच्या(एचएसआरपी) नंबर प्लेट असाव्यात , त्या माध्यमातून त्याची ऑनलाईन माहिती मिळणे सुलभ व्हावे. यासाठी केंद्र सरकारने सन २०१९ च्या अगोदरच्या सर्व वाहनांना नव्या नंबरप्लेट बसवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी मुदत २१ जून पर्यंतची दिली आहे. पण एकूण नंबर प्लेट बदलणे आवश्यक असणाऱ्या वाहनांची संख्या, आजवर अर्ज केलेल्या वाहनधारकांची संख्या, प्रत्यक्ष नव्या नंबर प्लेट बसविलेल्या वाहनांची संख्या, ती बसवण्यासाठी असणारी केंद्रे या सगळ्यांचा कुठेच 'मेळ' बसताना  दिसत नाही.

त्यातच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने नवीन नंबर प्लेट बसल्याशिवाय जुन्या वाहनांचे व्यवहार केले जाणार नाहीत असे परिपत्रक काढले आहे.त्याची अंमलबजावणी सोमवार दि.१६ पासून होत आहे.त्यामुळे नंबर प्लेट बदलण्याचा हा 'खेळ' अजून किती दिवस चालणार हे समजत नाही.

शासनाच्या निर्णयानुसार कराड- पाटण तालुक्यातही नंबर प्लेट बदलण्यासाठी वाहनधारकांची  घाई सुरू आहे. पण त्यांनी नियुक्त केलेल्या अनेक सेंटरवर त्यांचे एजंट वाहनधारकांची पिळवणूक व फसवणूक करत आहेत.अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.

नवीन नंबरप्लेटसाठी वाहनधारकांना ऑनलाईन अर्ज करताना दुचाकी साठी ५३१ रुपये तर चार चाकी गाडीसाठी ८७९ रुपये ऑनलाईन भरावे लागत आहेत. त्यावेळी कोणत्या सेंटरला नंबरप्लेट हवी आहे हे देखील अर्जदार त्यात माहिती भरत आहे. तेव्हाच तुमच्या गाडीची नंबर प्लेट किती तारखेला संबंधित सेंटरला येणार याची माहिती ऑनलाईनच मिळत आहे. पण प्रत्यक्षात दिलेल्या तारखेलाच नव्हे तर ८/१० दिवस उलटले तरी या नव्या नंबरप्लेट येथे मिळत नाहीत.तोपर्यंत हेलपाटे घालून वाहनदार मेटाकुटीला येत आहे.

त्यांचा त्रास एवढ्यावरच थांबत  नाही .नंबरप्लेट आल्यावर खरा त्रास सुरु होतोय.संबंधित सेंटरवरील एजंटांचा मग भलताच खेळ सुरू होत आहे. वाहनदारांची खऱ्या अर्थाने पिळवणूक अन फसवणूक येथे सुरू होते. पण याकडेही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

कराड - पाटण ला १८ सेंटर 

कराड पाटण तालुक्यातील वाहनधारकांसाठी नंबर प्लेट बसवणे सोयीस्कर व्हावे म्हणून अशी १८ सेंटर देण्यात आली आहेत. पण ही सेंटर देत असताना तेथे वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा आहे का? इतर सुविधा नीट देता येतील का? वाहनधारकांना त्रास होणार नाही ना ? याचा अभ्यास केलेला दिसत नाही. 

'ब्रॅकेट'साठी सक्ती 

संबंधित कंपनीकडून नंबर प्लेट तयार होऊन आल्यानंतर ती सेंटरमध्ये बसवली जात आहे. पण ती बसवताना अनेक सेंटरमध्ये त्याच्या बाजूने ब्रॅकेट बसवण्याची सक्ती केली जात आहे.त्यासाठी दुचाकी ला २०० रुपये तर चारचाकी ला ४००रुपये ज्यादा आकारले जात आहेत. पण ही सक्ती कशासाठी केली जातेय.

कशी आहे सध्याची परिस्थिती?
कराड उपविभागीय प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत

  • नवीन नंबर प्लेट बदलणे आवश्यक वाहने- १ लाख ६३ हजार २१७
  • नंबर प्लेट बदलण्यासाठी अर्ज केलेले वाहनधारक- ३० हजार ४२९
  • नंबर प्लेट बदलण्यासाठी केंद्रे - १८ 
  • नंबर प्लेट बदललेली वाहने - २० हजार १२


निर्धारित वेळेत नंबर प्लेट बदलून होणे अवघड

खरंतर शासनाने नंबर प्लेट बदलण्यासाठी २१ जून पर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याची मुदत दिली आहे. परंतु कराड उपविभागीय प्रादेशिक कार्यालयाचा विचार केला तर  प्रत्यक्षात आजपर्यंत सुमारे २० हजार वाहनांच्याच नंबर प्लेटस बदलून झालेल्या आहेत. हा सगळा सावळा गोंधळ लक्षात घेतला तर निर्धारित वेळेत नंबर प्लेट बदलून होतील असे वाटत नाही. 

व्यवहार खोळंबणार 

शासनाने १६ जून पासून नव्या नंबर प्लेट शिवाय जुन्या गाड्यांचे व्यवहार होणार नसल्याचे परिपत्रक काढले आहे.पण या सगळ्या प्रक्रियेला होणारा विलंब, त्यातील सावळा गोंधळ पाहता लगेचच नव्या नंबर प्लेट बसवून होतील असे वाटत नाही. त्यामुळे जुन्या गाड्यांचे व्यवहार मात्र रखडतील हे नक्की!

शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार सोमवार दि.१६ पासून ओघानेच आमच्या सॉफ्टवेअर मध्ये बदल केले जातील. त्यामुळे नवीन नंबर प्लेट शिवाय जुन्या वाहनांचे व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे वाहनधारकांनी दिरंगाई न करता दिलेल्या मुदतीत पहिल्यांदा नवीन नंबर प्लेटसाठी आँनलाईन नाव नोंदणी करावी. म्हणजे वाहनधारकांना त्रास होणार नाही. - चैतन्य कणसे, मोटार वाहन निरीक्षक, कराड

Web Title: No transactions will be made for old vehicles without HSRP number plates in karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.