ना चारा, ना पाणी; दुष्काळी आणीबाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:11 IST2018-10-23T23:10:38+5:302018-10-23T23:11:06+5:30
नितीन काळेल। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ना चारा, ना पाणी अशी स्थिती जिल्ह्यातील शेकडो गावांत असतानाच राज्यातील १८० ...

ना चारा, ना पाणी; दुष्काळी आणीबाणी
नितीन काळेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ना चारा, ना पाणी अशी स्थिती जिल्ह्यातील शेकडो गावांत असतानाच राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश्य असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
करून एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, या घोषणेमध्ये जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा समावेश नाही. तर माण, खंडाळा, फलटणमध्ये गंभीर
तर कºहाड, कोरेगाव, वाईत
मध्यम स्वरुपाची दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात वेळेत हजेरी लावलेल्या पावसाने पश्चिम भाग वगळता पूर्वेकडे कायमच उघडीप दिली. त्यामुळे पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगावसह इतर तालुक्यांत सद्य:स्थितीत दुष्काळस्थिती गंभीर आहे. आगामी काळात तर जिल्ह्यातील इतर भागातही भीषण स्थिती निर्माण होणार आहे. सध्या पूर्व भागात रब्बीची पेरणी आणि जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणमध्ये आत्तापर्यंत २२८ मिलीमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ५४ टक्के आहे. खटाव तालुक्यात आतापर्यंत ४४२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी काही भागात अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यात आतापर्यंत ६० टक्के पाऊस झाला आहे. कोरेगाव तालुक्यात ३९८ मिलीमीटर पाऊस पडला असून, टक्केवारी ६४ इतकी आहे.
जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक तालुके दुष्काळी स्थितीला सामोरे जात असताना काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सॅटेलाईटने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील खटाव तालुक्याचा समावेश दुष्काळात नव्हता. कोरेगाव, खंडाळा, वाई, कºहाड, फलटण आणि माणचा समावेश होता. त्यावेळी खटावचा समावेश दुष्काळी तालुक्याच्या यादीत नसल्याने जोरदार आरोप झाले होते. आंदोलन करण्यात आले होते. असे असतानाच मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील १८० दुष्काळसदृश्य तालुक्यांची घोषणा केली. यामध्ये खटाव तालुक्याचा समावेश नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. तर जिल्ह्यातील
सहा तालुक्यात दुष्काळसदृश्य
स्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये माण, फलटण
आणि खंडाळामध्ये गंभीर दुष्काळ तर कºहाड, कोरेगाव आणि वाईत मध्यम दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले. खटाव तालुक्याचा दुष्काळसदृश्य तालुक्यात समावेश नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चारा छावणी का डेपो...
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळी तालुक्यांमध्ये आता उपाययोजना सुरू होतील; पण जनावरांना आताच चारा नाही. पिण्याच्या पाण्याची स्थिती देखील गंभीर होत चालली आहे. जनावरांना वेळेत चारा व पाणी मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करणे गरजेचे आहे. तरच मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला अर्थ राहणार आहे.
मकेची वैरण दीड हजारला शेकडा...
सध्या पूर्व भागातील खरीप हंगाम संपला आहे. बाजरीची वैरण जनावरे फारसी खात नाहीत. त्यातच पुरेशी ओल नसल्याने रब्बी हंगाम घेणेच अवघड झाले आहे. त्यामुळे सध्या मका काढणी सुरू आहे. या मकेच्या कडब्याचा दर १०० पेंडीला १२०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान आहे. या कडब्याचा दर पूर्वी ७० रुपयांपर्यंत होता. त्यामध्ये आतापासूनच वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहेत.