मनपा पश्चिम कार्यालय; घरपट्टी विभाग सुविधांविना
By Admin | Updated: June 15, 2016 00:09 IST2016-06-14T22:46:11+5:302016-06-15T00:09:59+5:30
एकच संगणक : अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा

मनपा पश्चिम कार्यालय; घरपट्टी विभाग सुविधांविना
नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागात नव्यानेच बदलून आलेले कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने वसुली संथगतीने सुरू आहे, शिवाय १८ कर्मचारी असूनही विभागात केवळ एकच संगणक पुरविण्यात आला आहे. स्मार्ट नाशिकसाठी अत्याधुनिक मोबाइल अॅपसह संगणकीय तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या आयुक्तांकडून महसूल वसूल करणाऱ्या विभागातील अत्याधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांपैकी पश्चिम विभाग हा उच्चभू्र वस्तीचा असल्याने याठिकाणी महापालिकेला महसूल मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असतो. मनपा प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने पश्चिम विभागीय कार्यालयातही नव्याने बदलून आलेले कर्मचारी रुजू झाले आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयाकडून वसुलीसंबंधी कसलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही अथवा जुन्या कर्मचाऱ्यांकडून त्याबाबतची माहिती पुरविण्यात आलेली नाही. त्यामुळे नवख्या व अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे घरपट्टी वसुलीचा वेगही मंदावला आहे.
कर्मचारी प्रशिक्षित नसल्याने कामकाजालाही विलंब लागतो. त्यामुळे घरपट्टी भरणा करण्यास येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत असते. घरपट्टी विभागात १८ कर्मचारी कार्यरत असून, विभागात केवळ एकच संगणक पुरविण्यात आला आहे.
पंडित कॉलनीतील बिल भरणा केंद्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी असते; परंतु एकच संगणकामुळे कामकाजास विलंब होत असतो. त्यातच जुन्या जमान्याचा प्रिंटर व अन्य सोयी उपलब्ध करून दिल्यानेही कामकाजात अडथळे निर्माण होत असतात. महापालिका आयुक्तांनी सदर विभागाकडे जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणवर्ग घ्यावे आणि आवश्यक साधनसामग्री पुरवावी, जेणेकरून ग्राहकांचा वेळ वाया जाणार नाही, अशा प्रतिक्रिया ग्राहकांमधून ऐकायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)