पुढचा बाप्पा पर्यावरणाचा; आजचा श्वास धोक्याचा!--लोकमतचा प्रभाव
By Admin | Updated: November 24, 2014 23:07 IST2014-11-24T22:35:27+5:302014-11-24T23:07:51+5:30
शिवेंद्रराजेंच्या निर्णयाचे स्वागत : कार्यकर्ते अन् प्रशासन भूमिकेबद्दल मात्र सातारकरांना साशंकता

पुढचा बाप्पा पर्यावरणाचा; आजचा श्वास धोक्याचा!--लोकमतचा प्रभाव
सातारा : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली होती. ‘लोकमत’ने त्यांचाच विचार गणेशोत्सवाआधी वाचकांपर्यंत पोहचविला. ‘लोकमत’च्या या चळवळीमुळे असंख्य वाचकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. आता सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने या चळवळीला बळ मिळणार आहे. मात्र, आजच्या घडीला मंगळवार तळ्याची झालेली दुर्दशा दूर करण्यासाठी शिवेंद्रराजे प्रशासनाला कशा पध्दतीने कामाला लावतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे प्रभावी माध्यम असणाऱ्या गणेशोत्सवाला दिवसेंदिवस वेगळे वळण लागत आहे. लोकसंख्या वाढली तशी गणपती मूर्तींची संख्या वाढली. त्यातच सार्वजनिक गणेश मंडळांमधील स्पर्धा वाढल्याने ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना मागे पडली. पूर्वी नैसर्गिक रंग वापरुन मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्ती बसविल्या जात; परंतु आता सर्रास पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिस व विषारी रंगांचा वापर होतो. याच मूर्तींचे नदी, तलावांमध्ये विसर्जन केले जाते. यामुळे नदी व तलावांतील पाणी दूषित होते. तलावांशेजारच्या विहिरी व बोअरवेल यांचे पाणीही दूषित बनते. विसर्जनानंतर जलचर मृत्युमुखी पडतात. मूर्ती तशाच अवस्थेत पाण्यात राहतात. पुन्हा तळी साफ करण्यासाठी लाखो रुपये खर्चावे लागतात.
दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने यंदा आवाज उठविला होता. पर्यावरणपूरक पर्यायही सूचविले होते. त्यानुसार पालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तळी तयार केली. तसेच शहरातील ऐतिहासिक हौदांची साफसफाईही केली. मंगळवार तळ्यात मूर्ती विसर्जनाला विरोध करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी विसर्जनाच्या काळात आपली भूमिका मवाळ केली. त्यामुळे मंगळवार तळ्यातही विसर्जन झाले.
पुढचा गणेशोत्सव मात्र पर्यावरणपूरकच करायचा, असा निर्धार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डॉ. दाभोलकर पुरस्कार वितरण समारंभातच जाहीरपणे व्यक्त केला. या निर्धारामुळे पर्यावरण जतनाचे नवे पर्व निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘लोकमत’च्या भूमिकेला लोकनेतृत्वाचेही बळ मिळाले असल्याने पुढील वर्षी आणखी चांगले आणि सकारात्मक चित्र शहरात पाहायला मिळू शकेल. राज्यात आदर्श घालून देण्याची संधी सातारकरांना मिळाली आहे. (प्रतिनिधी)
सकारात्मक हेतूने पुढे या...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मांडलेला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. मी माझ्या घरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बसवितो. सातारकरांनीही आता सकारात्मक हेतूने पुढे यावे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार
आजची ताजी स्थिती
तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे
तांब्या-पितळ्याची, चांदीची भांडी काळी पडत आहेत
किरकोळ ताप-थंडी, संसर्गाच्या तक्रारी सुरू
अनंत इंग्लिश स्कूलसमोरील वस्तीत दुर्गंधी
रहिवाशांच्या नाकाला पुन्हा रुमाल...
सातारा : गणेश विसर्जनानंतर महिन्याच्या आत मंगळवार तळे स्वच्छ करण्याचे पालिकेचे आश्वासन विरले असून हवेत तीव्र प्रदूषण पसरत चालले आहे. पुन्हा एकदा नाकाला रुमाल लावून घराबाहेर पडण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. गणेश मंडळांना खूश करताना पालिकेने स्थानिकांचा रोष मात्र ओढवून घेतला आहे.
मंगळवार तळ्याच्या प्रदूषणाचा मुद्दा गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासून ‘लोकमत’ने लावून धरला होता. खासदार उदयनराजे भोसले यांच्यापासून पालिकेच्या अनेक पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच ‘यंदा तळ्यात विसर्जन नाही,’ असा पवित्रा घेतला होता. कमी उंचीच्या गणेशमूर्ती, शाडूच्या मूर्ती याविषयी ‘लोकमत’सह अनेक संंस्था, संघटनांनी प्रबोधन केले होते. या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले होते. पालिकेने गोडोलीत विसर्जन तलावही बांधला होता. तथापि, गणेशोत्सव मंडळांच्या आग्रही भूमिकेनंतर मंगळवार तळ्यात विसर्जन होऊ न देण्याचा पवित्रा पालिकेने सौम्य केला. विसर्जनानंतर महिनाभरात तळे स्वच्छ करून गाळ काढण्याचे आश्वासन देऊन विसर्जनास परवानगी देण्यात आली.
आठ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. आज ऐंशी दिवस होत आले तरी मंगळवार तळ्याकडे पालिकेचे लक्ष गेलेले नाही. पुन्हा तीच तीव्र दुर्गंधी वातावरणात पसरली आहे. रहिवाशांची भांडी, दागिने, काळे पडू लागले आहेत. प्रदूषणामुळे यापूर्वी पसरलेल्या आजार पुन्हा डोके वर काढणार या कल्पनेनेच रहिवाशांची गाळण उडाली आहे. (प्रतिनिधी)