नववर्ष स्वागताला भेसळीचे गालबोट
By Admin | Updated: January 2, 2015 00:06 IST2015-01-01T21:45:52+5:302015-01-02T00:06:05+5:30
फलटणमधील चित्र : अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

नववर्ष स्वागताला भेसळीचे गालबोट
फलटण : फलटण तालुक्यात नववर्षाच्या स्वागताचा आनंद घेण्यासाठी हजारो लोकांनी हॉटेल, ढाब्यावर गर्दी केली होती. मात्र, काही हॉटेल व ढाबेवाल्यांनी निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ देण्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. दोन वर्षांपूर्वी कुत्र्याचे मांस खायला घालण्याच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर तसाच प्रकार काहीनी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. फलटण तालुक्यात हॉटेल व ढाब्यांची विपुल संख्या असून, काही हॉटेल व ढाब्यावाल्यांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ३१ डिसेंबर म्हणजे हॉटेल व ढाबेवाल्यांचा चांदीचा दिवस असतो. काहीजण यातून चांगली सेवा देण्याचा तर काहीजण बक्कळ पैसा कमविण्याचा उद्योग करीत असतात. त्यासाठी अन्नपदार्थांत भेसळ, मांसामध्ये भेसळ, बनावट दारूचा वापर असा प्रकार सर्रास सुरू आहे. दीड वर्षापूर्वी सांगवी येथील एका ढाब्यावर छापा टाकून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा साठा व तयार करण्याचे मशीन जप्त केले होते. तसेच दोन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरला एका ढाब्यावाल्याने मटणात भेसळ करून ग्राहकांना खायला घातले होते. या प्रकारामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती. तालुक्यात फारच कमी परवानाधारक हॉटेल्स व ढाबेवाले असून, त्यांच्याकडे दारू विक्रीचाही परवाना आहे. मात्र, ज्यांच्याकडे नाही त्यांनीही मुक्तहस्ताने दारूची आपल्या ठिकाणावरून अव्वाच्या सव्वा दर आकारून विक्री केली. काहीनी तर कसेही जेवण बनवून तळीराम ग्राहकाला खाऊ घातले. जेवणावरून तक्रारींचेही प्रकार घडले गेले. नववर्षाच्या पुर्वसंध्येला अन्न व औषध प्रशासनाची कोठेही तपासणी यंत्रणा दिसून आली नाही. अनेक ग्राहकांची घोर फसवणूक झाल्याचे आढळून आले. खात्याच्या मनमानी कारभाराविराधात नागरिक तक्रारी करणार आहेत. (प्रतिनिधी) या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाने सतर्कता बाळगत हॉटेल व ढाबेवाल्यांची तपासणी करणे गरजेचे होते. यावेळेस पहाटे पाचपर्यंत हॉटेल व ढाबेवाल्यांना परवानगी असल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे असताना व याबाबत अन्न व औषध प्रशासनाला सातारा कार्यालयात कळवूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष करीत आपले हात ओले करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.