राष्ट्रवादी-भाजपमध्ये रंगणार नवा सत्तासंघर्ष..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:01+5:302021-09-07T04:47:01+5:30
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार ऐन दिवाळीत उडणार आहे. प्रभाग रचनेच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असल्याने ...

राष्ट्रवादी-भाजपमध्ये रंगणार नवा सत्तासंघर्ष..
खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बार ऐन दिवाळीत उडणार आहे. प्रभाग रचनेच्या आदेशानंतर प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्तासंघर्षात पाच वर्षांत राजकीय पटलावर अनेक उलथापालथ झाल्याने रंगतदार लढती होणार, हे स्पष्ट आहे. गटा-तटाच्या राजकारणाने पक्षीय धोरणांना तिलांजली दिल्याने अनपेक्षित घडामोडी घडल्या असल्या, तरी शेरास सव्वाशेर ठरलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच नवा सत्तासंघर्ष रंगणार असल्याचे चित्र आहे.
नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर चुरशीची लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी नऊ, काँग्रेस सात आणि ‘रिपाइं’पुरस्कृत अपक्ष एक अशा जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपला पॅनेलही पूर्ण करता आले नव्हते. एकही जागा निवडून आणता आली नाही. पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादीने आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेवर मोहोर उमटविली आणि त्याला अपक्षांची साथ मिळाली. काँग्रेसचे तत्कालीन प्रमुख अनिरुद्ध गाढवे यांच्या नेतृत्वाखाली काट्याची टक्कर देऊनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागले.
नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीची घडी बसविण्याचे मोठे आव्हान घेऊन राष्ट्रवादीचे प्रथम नगराध्यक्ष शरदकुमार दोशी व उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे यांनी कारभाराला सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांनी एकजिवाने केलेल्या कामाचे हे फलित होते. शहराच्या विकास कामांचा आराखडा तयार करून विविध कामांचा धडाकाही करण्यात आला. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादीत पहिली ठिणगी पडली आणि अंतर्गत गटा-तटाचे राजकारण पुन्हा उफाळून आले. हाच वाद पुढे धुमसत राहिला आणि अंतर्गत दुफळी वाढत गेली.
पहिल्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केले. खंडाळ्यावरील सत्ता गेल्याचे शल्य घेऊन वावरणाऱ्या काँग्रेसच्या चाणाक्ष नेतृत्वांनी दुफळीचा फायदा घेऊन पुढील नगराध्यक्ष निवडीत अचूक डाव टाकला. राष्ट्रवादीच्या या गटाचे नेतृत्व करणाऱ्या लताताई नरुटे-पाटील यांना नगराध्यक्षपदी बसवले. उपनगराध्यक्षपद काँग्रेसने आपल्या पदरात घेऊन राष्ट्रवादीला चपराक दिली. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली. ही निर्माण झालेली दरी राष्ट्रवादीच्या प्रमुखांनाही मिटवता आली नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपदाच्या खुल्या आरक्षणात काँग्रेसच्या गटाने नगराध्यक्षपदी प्रल्हाद खंडागळे यांची नियुक्ती करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. पक्षांतर्गत गटांच्या महत्त्वाकांक्षेपोटी बहुमतातील राष्ट्रवादी सत्तेबाहेर फेकली गेली. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी खंडाळ्यात पुन्हा राजकीय स्थित्यंतरे घडली. काँग्रेस प्रमुखांसह सर्वांशी भाजपात प्रवेश केला. पूर्वाश्रमीची काँग्रेस विलीन झाल्याने शहरात भाजप प्रबळ बनली. यात सर्व नगरसेवकांनी पक्षनेतृत्वाशी निष्ठा बाळगली. त्यामुळे शहरातील काँग्रेस संपुष्टात आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला प्रबळ भाजपाशी सामना करावा लागणार आहे.
भाजपशी लढा देताना राष्ट्रवादीतील जुन्या नेत्यांचा संगम आणि नव्या तरुणाईची ताकद यांचा मेळ घालून अंतर्गत मतभेद मिटविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे राहणार आहे. भाजपात नवे नेतृत्व प्रबळ असले, तरी जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन रणनीती आखावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात काही लोकांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन सवतासुभा थाटला आहे. संपर्कप्रमुख प्रकाश गाढवे यांच्यासह काँग्रेस विचाराच्या लोकांनी पुन्हा उभारी घेऊन बळ एकवटले. ही संख्या वाढत असल्याने त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. शहरात नावापुरती असलेल्या शिवसेनेत वाढ झाल्याचे चित्र अद्यापतरी दिसून येत नाही परंतु निष्ठावान मतदारांमुळे ठराविक प्रभागात त्यांचे पाठबळ इतरांना तारून नेणारे ठरू शकते. हक्काच्या प्रभागात आरपीआय आपला ठसा कायम ठेवण्याच्या इराद्यात आहे. मात्र शहरात झालेली बदनामी पुसून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कंबर कसून एकवटण्यासाठी आतूर आहेत. सत्तेवरची पकड काही केल्या सोडायची नसल्याचा निर्धार भाजपच्या गोटात पक्का आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाचे घमासान नाट्य अनुभवायला मिळणार, हे निश्चित आहे.