नवीन महाबळेश्वर संधी आणि आव्हाने; चार भागात विभागला गेलाय प्रकल्प

By दीपक शिंदे | Updated: January 27, 2025 14:04 IST2025-01-27T14:04:06+5:302025-01-27T14:04:33+5:30

दीपक शिंदे , उप वृत्तसंपादक, सातारा सातारा जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत अनुकूल असला तरी त्यापद्धतीने सुविधांची कोणतीच परिस्थिती याठिकाणी ...

New Mahabaleshwar Opportunities and Challenges | नवीन महाबळेश्वर संधी आणि आव्हाने; चार भागात विभागला गेलाय प्रकल्प

संग्रहित छाया

दीपक शिंदे , उप वृत्तसंपादक, सातारा

सातारा जिल्हा हा पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत अनुकूल असला तरी त्यापद्धतीने सुविधांची कोणतीच परिस्थिती याठिकाणी नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भूमिपुत्र असल्याने त्यांनी नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प पुन्हा एकदा मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला. यापूर्वी याच प्रकल्पाला विरोध झाल्याने त्याच्यावर फारसे काम झाले नव्हते. आता विरोध करणारी गावेही नवीन प्रकल्पात आमचा समावेश करा, असे सांगू लागली आहेत. तर पर्यावरणप्रेमींचा या प्रकल्पाला विरोध आहे. यामुळे नवीन महाबळेश्वरमध्ये काय होणार आणि नवीन महाबळेश्वरचे काय होणार असा प्रश्न सतत अनेकांना पडत असतो.

नवीन महाबळेश्वर प्रकल्प काय आहे हे प्रथमत: जाणून घेण्याची आवश्यकता आहे. नवीन महाबळेश्वरमध्ये २३५ गावांचा समावेश आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा प्रामुख्याने चार भागात विभागला गेला आहे. त्यामध्ये उत्तरेकडील महाबळेश्वर, उत्तर पश्चिम भागातील जावळी, पूर्वस्थित सातारा आणि दक्षिणेकडील पाटण याचा समावेश आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्याचा पर्यटकांना लाभ घेता यावा यासाठी याठिकाणच्या जलाशयामध्ये बोटिंग, स्कूबा डाईंग, हाऊस बोट, स्टे होम, वॉटर स्पोर्ट असे विविध उपक्रम करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील काही कामेही सुरू झाली आहेत.

महाबळेश्वर आणि पाचगणी याठिकाणी देश आणि जगभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. काही लोक महाबळेश्वर, पाचगणीपेक्षा इतर ठिकाणी राहण्यासाठी आणि या ठिकाणी फिरण्यासाठी येण्याचे नियोजन करतात. पण, त्यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ते लवकर परत फिरतात. या पर्यटकांना तीन चार दिवस याच परिसरात थांबवून ठेवायचे असेल तर त्यांना तशा सुविधा आणि करमणुकीची साधने उपलब्ध करुन दिली पाहिजेत. हा एक भाग झाला तर त्याचवेळी पर्यावरण तज्ञांच्या मते या भागात मुळात लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यांना याचठिकाणच्या वातावरणात राहता आले पाहिजे, अशा सुविधा पर्यावरणाचे नुकसान न करता उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असाही मतप्रवाह आहे.

दुसरीकडे नवीन महाबळेश्वरमुळे पाण्यात गेलेली जमीन आणि बुडालेले उत्पन्नाचे साधन यामुळे या भागातील लोकांना पुन्हा एकदा रोजगार मिळून मुंबई - पुण्याकडे रोजगारासाठी गेलेला माणूस पुन्हा गावाकडे येईल. गावे बहरतील आणि त्यांना आपल्या रोजगारासाठी इतरांकडे नोकरी करावी लागणार नाही, असे सांगितले जाते. तर या भागात आता मूळच्या लोकांच्या खूप कमी जमिनी राहिल्या आहेत. पुणे - मुंबईच्या व्यापाऱ्यांनी याठिकाणच्या जमिनी घेतल्यामुळे या प्रकल्पाचा फायदा त्यांना होणार आहे. स्थानिकांना होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे.

विकास आणि पर्यावरण

  • पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी आपल्या सह्याद्री घाट संवर्धनाबाबत सादर केलेल्या अहवालात पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी अनेक बाबी मांडल्या आहेत. त्याचवेळी विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण या दोन परस्पर विरोधी गोष्टी असल्याचेही सांगितले आहे.
  • ज्यावेळी एखाद्या भागाचा विकास होत असतो त्यावेळी त्याठिकाणच्या पर्यावरणाला धक्का पोहचत असतो हे त्यांनी स्पष्टच केले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा या भागाचा पर्यटन विकास होणार तेव्हा इथल्या पर्यावरणालाही धोका पोहचू शकतो.


पर्यावरणाचे काय नुकसान होईल

  • रस्त्यासाठी झाडे तोडली जाणार,
  • मातीचे उत्खनन होणार,
  • पाण्यामुळे माती वाहून जाणार,
  • मूळची जमीन पाणी जाऊन भुसभुशीत होणार
  • या भागातील तांबडी जमीन पाणी सोडून देते. त्यामुळे भूस्सखलनासारख्या घटना घडू शकतात.


नवीन महाबळेश्वरमध्ये कोणत्या तालुक्यातील किती गावे
सातारा ३४, पाटण ९५, जावळी ४६ व महाबळेश्वर तालुक्यातील ६० गावांचा समावेश या प्रकल्पात केला आहे.

Web Title: New Mahabaleshwar Opportunities and Challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.