ॲनिमेशन, गेमिंगमध्ये मिळणार उद्योगाच्या नव्या वाटा; एव्हीजीसी-एक्सआर धोरणामुळे सातारासह अन्य जिल्ह्यांना संधी

By दीपक देशमुख | Updated: September 18, 2025 17:46 IST2025-09-18T17:46:16+5:302025-09-18T17:46:50+5:30

पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटी

New industry shares will be available in animation and gaming AVGC XR policy will provide opportunities to Satara and other districts | ॲनिमेशन, गेमिंगमध्ये मिळणार उद्योगाच्या नव्या वाटा; एव्हीजीसी-एक्सआर धोरणामुळे सातारासह अन्य जिल्ह्यांना संधी

संग्रहित छाया

दीपक देशमुख

सातारा : राज्य मंत्रिमंडळाने १६ रोजी ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरणाला मंजुरी दिली आहे. यामुळे साताऱ्यासह राज्यातील विविध शहरांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्य शासनाच्या धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून, स्थानिक युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेचे दरवाजे खुले होणार आहेत. या धोरणाचा जिल्ह्याला लाभ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

उद्योग क्षेत्राला नवा दर्जा

  • राज्य शासनाने एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा दिला आहे.
  • २०५० पर्यंतच्या नियोजनासह ३२६८ कोटींचा आराखडा तयार केला आहे.
  • पुढील २० वर्षांत सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
  • या माध्यमातून २ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.


सातारा व अन्य शहरांचा समावेश

सध्या राज्यात सुमारे २९५ एव्हीजीसी स्टुडिओ कार्यरत आहेत. याशिवाय मुंबई फिल्म सिटी, नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूरसोबतच सातारा येथे एव्हीजीसी-एक्सआर पार्क विकसित होणार आहेत.

या पार्कमध्ये हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटी, मोशन कॅप्चर स्टुडिओ, पोस्ट-प्रोडक्शन लॅब, हाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फर्म, साउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्चुअल प्रोडक्शन स्टुडिओ उपलब्ध राहणार. एआय आधारित ॲनिमेशन, रिअल-टाइम रेंडरिंग, इमर्सिव्ह अनुभव आणि मेटाव्हर्स उपाययोजनांची सुविधा दिली जाणार.

पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटी

योजनेत पहिल्या पाच वर्षांसाठी ३०८ कोटी आणि पुढील वीस वर्षांसाठी २,९६० कोटी, असा एकूण ३,२६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षासाठी २०२५-२६ साठी अतिरिक्त १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सहभाग निधी म्हणून २०० कोटींची, तर स्थानिक उद्योजकांच्या स्टार्टअपसाठी ३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

साताऱ्यात उभारण्यात येणाऱ्या एव्हीजीसी-एक्सआर पार्कमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार, प्रशिक्षण आणि स्टार्टअपची दालने उघडणार आहेत. शासनाने केलेल्या मोठ्या निधी तरतुदीमुळे सातारा जिल्हा राज्याच्या उदयोन्मुख डिजिटल मनोरंजन उद्योगाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल. या माध्यमातून स्थानिक प्रतिभेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. ही सुवर्णसंधी पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. - अवधूत निकम, आयटी अभियंता, सातारा

Web Title: New industry shares will be available in animation and gaming AVGC XR policy will provide opportunities to Satara and other districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.