कास ते सातारा नवीन २७ किलोमीटरची जलवाहिनी, खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली माहिती
By सचिन काकडे | Updated: June 26, 2023 19:14 IST2023-06-26T19:13:52+5:302023-06-26T19:14:37+5:30
केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून या कामासाठी १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर

कास ते सातारा नवीन २७ किलोमीटरची जलवाहिनी, खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली माहिती
सातारा : सातारा शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून, धरणातील पाणीसाठा पाच पटीने वाढला आहे. पुढील टप्प्यात कास धरण ते सातारा सुमारे २७ किलोमीटर लांब नवीन जलवाहिनीचे काम हाती घेतले जाणार असून, केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून या कामासाठी १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कास धरणाची उंची वाढविण्यात आल्याने सातारकरांना सायफन पद्धतीने मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. उंची वाढवल्याने, पूर्वीची ०.१ टीएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आता ०.५ टीएमसी क्षमतेचे झाले आहे. या वाढीव पाणीसाठ्याच्या सुयोग्य वितरणासाठी पूर्वीच्या बंदिस्त पाइपलाइनला समांतर नवीन अतिरिक्त जलवाहिनी नुकतीच केंद्र शासनाकडून मंजूर करून घेतली आहे. त्यानुसार नवीन जलवाहिनीच्या कामास आता सुरुवात होत आहे.
या जलवाहिन्या कास धरण परिसरात दाखल झाल्या असून, आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या जुन्या जलवाहिनीशी समांतर अंथरल्या जाणार आहेत. कास योजना पूर्ण झाल्यानंतर शहापूर योजना नजीकच्या काळात बंद करून, त्या योजनेला कासचेच पाणी जोडले जाईल. तसेच कण्हेर उद्भव योजनेला देखील कासचे पाणी जोडण्यात येणार आहे.