सामाजिक स्वास्थ्यासाठी लसीकरणाची गरज : अभ्यंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:27+5:302021-06-17T04:26:27+5:30
वाई : ‘आज साऱ्या जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. यावर लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे, लसीकरणामुळे प्रत्येक ...

सामाजिक स्वास्थ्यासाठी लसीकरणाची गरज : अभ्यंकर
वाई : ‘आज साऱ्या जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. यावर लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे, लसीकरणामुळे प्रत्येक माणूस विषाणूविरुद्ध तटबंदी बनून उभा राहतो, त्यामुळे आपले सामाजिक स्वास्थ्य टिकायचे असेल तर लसीकरण गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन वाई येथील डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालय वाई व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड या महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये कोरोना जागृती व लसीकरण या विषयावर ते बोलत होते. वाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव, डॉ. जयंतराव चौधरी, पाचवड कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप शिंदे, प्रा. शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव म्हणाले, डॉ. अभ्यंकर यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामुळे लसींची माहिती मिळाली. कोरोना महामारीच्या काळातून वाचायचे असेल तर लसीकरणाशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही. सामान्य लोकांच्या मनातील शंकाकुशंका आजच्या व्याख्यानाने दूर होतील व सर्वजण लसीकरणासाठी सज्ज होतील.
डॉ. जयवंतराव चौधरी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रास्ताविक लेफ्टनंट समीर पवार यांनी केले. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.