व्यूहरचनेत राष्ट्रवादीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2015 00:21 IST2015-05-07T23:00:26+5:302015-05-08T00:21:08+5:30
खंडाळा तालुका : काँग्रेसने शब्द पाळला; मात्र मतदान विरोधात !

व्यूहरचनेत राष्ट्रवादीचा विजय
दशरथ ननावरे - खंडाळा -जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दत्तानाना ढमाळ यांनी बाजी मारून बँकेतील सेकंड इनिंगला प्रारंभ केला. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शिस्तबद्ध व्यूहरचना केल्याने विरोधी गोटातीलही मते मिळूवन मोठा विजय संपादित केला. काँग्रेसने जिल्हा बँकेला उमेदवार देणार नसल्याचा शब्द पाळला खरा मात्र मतदान राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात करून तालुक्यात आमचा विरोध कायम असल्याचे पुन्हा एकादा या निवडणुकीतून समोर आले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षांतर्गतच मोठी रस्सीखेच होती. पक्षाने अधिकृत उमेदवारी विद्यमान संचालक दत्तानाना ढमाळ यांना जाहीर केल्याने बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील , जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके, शामराव गाढवे हे प्रबळ दावेदार नाराज झाले होते. त्यातच आनंदराव शेळके यांचा अर्ज कायम राहिल्याने त्यांची भूमिका गुलदस्त्यात होती.
वास्तविक, खंडाळा सोासायटी मतदारसंघात राष्ट्रवादीकडे ५१ पैकी ३६ सोसायट्यांसह प्राबल्य होते. मात्र, बकाजीराव पाटील यांच्या बंडाळीने आणि नितीन भरगुडे-पाटील यांच्या नाराजीने राष्ट्रवादीतच गट निर्माण झाले. मात्र पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग आमदार मकरंद पाटील यांनी बांधला. तालुक्यातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका मांडली तसेच नाराजांची नाराजी दूर करण्यातही यश मिळविले. मात्र अखेरपर्यंत काँग्रेस आणि नितीन भरगुडे-पाटील यांची भूमिका स्पष्ट झाली नसल्याने खंडाळ्यातील चुरस कायम होती.
खंडाळा साखर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बिनविरोध झाली होती. त्यामुळे जिल्हा बँकेला काँग्रेसचा उमेदवार न देण्याचा शब्द ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी पाळला; पण, राष्ट्रवादीतच बंडाळी उफाळून आल्याने लढत गुरू-शिष्यामध्येच रंगली.
४ भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून निवडणूक लढविणारे अजय धायगुडे-पाटील यांना ५४५ मतांपर्यंतच मजल मारता आली. तर इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राजेंद्र नेवसे यांना ३९ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे दोघांनाही राखीव मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. वास्तविक, राजेंद्र नेवसे यांनी प्रचारात कुठेही आघाडी घेतल्याचे दिसले नाही.