राष्ट्रवादीकडे इच्छुकच कमी

By Admin | Updated: August 21, 2014 00:27 IST2014-08-20T23:26:03+5:302014-08-21T00:27:37+5:30

विधानसभा निवडणूक : माणमध्ये चार; फलटणमध्ये पाच अर्ज

NCP wants only less | राष्ट्रवादीकडे इच्छुकच कमी

राष्ट्रवादीकडे इच्छुकच कमी

सातारा : कोरेगाव, वाई, सातारा आणि कऱ्हाड उत्तर या चार विधानसभा मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून फक्त विद्यमान आमदारांचेच उमेदवारी मागणी अर्ज आल्याचे बुधवारी रात्री स्पष्ट झाले. माण आणि फलटणमध्ये मात्र मोठी चुरस आहे. येथून अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. पाटणमध्ये पाटणकर पिता-पुत्रांनी अर्ज नेले आहेत.
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून, यापैकी आघाडीधर्मानुसार सहा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर दोन काँग्रेसकडे आहेत. मात्र, राष्ट्रवादीने सर्वच मतदारसंघांतून इच्छुक कोण आहे, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी दि. ११ आॅगस्टपासून राष्ट्रवादी भवनात अर्ज उपलब्ध करून दिले होते. यासाठी अंतिम मुदत दि. २० आॅगस्ट होती.
कोरेगाव मतदारसंघातून मंत्री शशिकांत शिंदे, सातारामधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाईतून आ. मकरंद पाटील आणि कऱ्हाड उत्तरमधून आ. बाळासाहेब पाटील यांनीच अर्ज नेले आहेत. रात्री उशिरा हे अर्ज राष्ट्रवादी भवनात देण्यात आले.
पाटणमधून आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी उमेदवारी मागणी अर्ज भरले आहेत. त्यांनीही रात्री हे अर्ज राष्ट्रवादी भवनात दिले.
दरम्यान, माण आणि फलटणमधून सर्वाधिक मागणी अर्ज आहेत. आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार सदाशिवराव पोळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व कविता म्हेत्रे यांनी अर्ज भरले आहेत. फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण, नंदू मोरे, डॉ. सतीश बाबर, सुधीर अहिवळे, बापूराव जगताप यांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

आमदार बंधूंची
‘कऱ्हाड दक्षिण’मधून मागणी
आघाडीधर्मानुसार ‘कऱ्हाड दक्षिण’ची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, येथून कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू सुभाष पाटील यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचे पांडुरंग चव्हाण यांनीही येथून शड्डू ठोकला आहे. या दोघांचेही मागणी अर्ज रात्री राष्ट्रवादी भवनात आले.

इच्छुकांच्या मंगळवारी
मुंबईत मुलाखती
राष्ट्रवादीकडून विधानसभा लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती मुंबई येथे राष्ट्रवादी भवनात होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवार, दि. २६ रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

Web Title: NCP wants only less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.