सातारा : जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकीचे चित्र पाहता पाचगणी व महाबळेश्वरचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढतीचे चित्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. १७) होते. त्यामध्ये सातारा, कराड, मलकापूर, रहिमतपूर, फलटण, म्हसवड व वाई नगरपालिकांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, उद्धवसेना आपल्या स्थानिक ताकतीनुसार निवडणूक लढविताना दिसत आहेत.सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने पक्षचिन्हांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सात ठिकाणी स्थानिक आघाडींचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच पक्षचिन्हांवर नगरपालिका निवडणूक होत आहे. सातारा शहरातील नगराध्यक्षपदाची लढत भाजपचे अमोल मोहिते विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील यांच्यात होण्याची शक्यता आहे. तसेच, कराड व मलकापूर नगरपालिकेतील प्रमुख लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) अशी आहे. केवळ महाबळेश्वर व पाचगणी येथील स्थानिक आघाडींचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसाठी भाजपने नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
नगरपालिकानिहाय नगराध्यक्षांच्या प्रमुख लढती
- सातारा : अमोल मोहिते (भाजप) विरुद्ध सुवर्णा पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
- कराड : विनायक पावसकर (भाजप) विरुद्ध राजेंद्र माने (यशवंत लोकशाही आघाडी), झाकीर पठाण (कॉंग्रेस)
- मलकापूर : तेजस सोनावले (भाजप) विरुद्ध आर्यन कांबळे (दोन्ही राष्ट्रवादी), संजय तडाके (कॉंग्रेस), अक्षय मोहिते (शिंदेसेना)
- फलटण : समशेरसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विरुद्ध अनिकेतराजे नाईक निंबाळकर (शिंदेसेना)
- रहिमतपूर : वैशाली माने (भाजप) विरुद्ध नंदना माने (राष्ट्रवादी व शिंदेसेना)
- म्हसवड : पूजा वीरकर (भाजप) विरुद्ध भुवनेश्वरी राजेमाने (राष्ट्रवादी अधिक महाविकास आघाडी)
- वाई : अनिल सावंत (भाजप) विरुद्ध नितीन कदम (राष्ट्रवादी), योगेश फाळके (शिंदेसेना), तेजपाल वाघ (आघाडी)
- पाचगणी : दिलीप बगाडे (स्थानिक आघाडी) विरुद्ध संतोष कांबळे (अपक्ष आघाडी)
- महाबळेश्वर : सुनिल शिंदे (राष्ट्रवादी) विरुद्ध कुमार शिंदे (शिंदेसेना), डी. एम. बावळेकर (स्थानिक आघाडी)
- मेढा (नगरपंचायत) : रुपाली वारागडे (भाजप) विरुद्ध सुनिता पारटे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...म्हसवड, कराड व मलकापूर या तीन नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आल्याचे चित्र आहे. तरी काही ठिकाणी भाजप विरोधात महायुतीतील मित्रपक्षांची छुपी युती झाल्याचे दिसून येते.