पहिला नगराध्यक्ष म्हणे राष्ट्रवादीचाच!
By Admin | Updated: April 30, 2016 00:58 IST2016-04-29T22:54:30+5:302016-04-30T00:58:03+5:30
त्रिवेणी संगम : भाजपला उपनगराध्यक्षपद मिळणार; अपक्षाचा बिनशर्त पाठिंबा--कौन बनेगा नगराध्यक्ष ?

पहिला नगराध्यक्ष म्हणे राष्ट्रवादीचाच!
लोणंद : लोणंद नगरपंचायतीचा पाहिला नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेवकाला संधी मिळाल्याचे निश्चित झाल्याचे समजते. लोणंदमध्ये राष्ट्रवादी-भाजपा आणि अपक्ष अशा त्रिवेणी संगमातून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अपक्ष नगरसेवकाने बिनशर्त पाठिंबा दिल्याचे समजते. त्यामुळे लोणंदमध्ये अखेर आमदार मकरंद पाटील यांचाच करिष्मा चालल्याचे दिसून येत आहे. दि. १८ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर लोणंदचा पहिला नगराध्यक्ष निवडीसाठी जोरदार रस्सीखेच होती. अपक्षासह राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करणे सोपे जाईल असे वाटत होते. असे असतानाच काँग्रेसने अपक्षाला हात दिल्याने नाट्यमय घटना घडल्या. भाजपाची दुटप्पी भूमिका असल्याने राष्ट्रवादीपुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र आमदार मकरंद पाटील यांनी आपले राजकीय कसब पणाला लावत भाजपालाही आपलेसे केले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आबांशी सत्तास्थानेबाबत चर्चा केल्या. याबाबत अधिकृत माहिती कोणाकडूनही देण्यात आली नाही. मात्र, भाजपाचे दोनही नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोठात गेल्याने लोणंदमधील राजकीय वर्तुळातील चर्चांना उधान आले होते.
एकीकडे भाजपाशी बोलणे सुरू असतानाच राष्ट्रवादीतील एका दादांसोबत भाजपाचे नगरसेवक पिकनिकवर गेल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे काँग्रेसचा सत्तास्थापनेतील दावा मागे पडला असून, सुरुवातीला अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांना प्राप्त झालेले महत्त्व कमी झाले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाच्या वर्तुळात सत्तास्थापना आणि जागा वाटपाच्या तहाच्या बोलण्यांसाठी दोन बैठका गुप्तरीतिने झाल्याची माहिती आहे. त्यातूनच राष्ट्रवादीला नगराध्यक्ष तर भाजपाला उपनगराध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर येत आहे.
अपक्ष नगरसेवकाने आमदार मकरंद पाटील व जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील यांची रात्रीत भेट घेऊन कोणतीही मागणी न करता पाठिंबा दर्शविल्याचे समजते.
राष्ट्रवादीसमोर उभ्या राहिलेल्या पेचप्रसंगातून मकरंद पाटील यांनी शांतपणे काढलेला मार्ग त्यांच्या कॅप्टन कुल प्रतिमेवर शिक्का मोर्तब करणारा ठरत आहे. अंतिम तहाची बोलणी रात्री एका बैठकीत निश्चित झाली असल्याने लोणंदमधील सत्तास्थानेचा तिढा आता सुटला असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
विषय समितीवर अपक्ष...
अपक्ष नगरसेवक सचिन शेळके यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी एका विषय समितीच्या सभापतिपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष नगरसेवकाने आपला पुढील राजकीय प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.