निलेश साळुंखेकोयनानगर: निसर्गाचे जतन व संवर्धन करा. तरच आपले जीवन सुखकारक होईल, हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून निसर्गपुजा करण्यात आली. मणदुरे, ता. पाटण येथे जळव खिंडीजवळील उंच काऊदरयावर सोमवारी सकाळी दहा वाजता हा सोहळा पार पडला. सातारा जिल्ह्यासह जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भाविक-भक्तांची यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाटण, तारळे, सातारा येथील निसर्गप्रेमी तसेच जेजुरीतील ग्रामस्थांनी यात्रा उत्सवाच्या पालखी परंपरेला गत काही वर्षात पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करीत वसुंधरा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यंदाही निसर्गपुजेची ही परंपरा जपण्यात आली. निवकणे येथील जानाईदेवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त जेजुरी येथुन आठ दिवस प्रवास करुन मार्तंड-जानाईदेवी पायी पालखी सोहळा निवकणेत येतो. जेजुरी येथून धार्मिक विधीपूर्वक रथासह पर्यावरणाचा संदेश देणारया पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा जयाद्री ते सह्याद्री असा दीडशे दोनशे किलोमीटर प्रवास करतो. सोमवारी सकाळी काऊदरयावर दाखल झाली. पुजा झाल्यानंतर झाडे लावा, झाडे जगवा अशी प्रार्थना करीत निसर्गाला नारळ अर्पण करण्यात आले. निसर्गपुजा कार्यक्रमास रविंद्र बारभाई, शेखर बारभाई, गणेश आगलावे विजय झगडे, शब्बीर तांबोळी, गोरख नारकर, शिवाजी कुतवळ, रेखाताई पाटील आदी जेजुरीचे भक्तगण, मणदुरे परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी कमलाकर म्हात्रे, दत्ता पाटील, अनिल म्हात्रे, सुभाष भोईर व मार्तंड जानाईदेवी पालखी सोहळा जेजुरीतील उपस्थित महिलांना साडीचोळी वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यातील भाविकांनी महाप्रसाद घेतल्यानंतर सोहळा सदस्यांनी काऊदरयावर स्वच्छता मोहिम राबविली. स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर वाजतगाजत जानाईदेवीच्या पालखीने निवकणेकडे प्रस्थान केले. चौकट शेंद्रेफाटा ते गणेश खिंड, निनाम पाडळी मार्गे पालखी तारळे येथे येते. गणेश खिंड दरम्यानचा रस्ता खराब असुन तो राज्याचे मंत्री पाटणचे लोकप्रतिनिधी ना. शंभुराज देसाई यांनी लक्ष घालुन वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी पालखी सोहळ्याच्यावतीने करण्यात आली. चौकट महाप्रसाद आणि पुजा झाल्यानंतर प्लास्टिक कचरा सड्यावर पसरला होता. तात्काळ जेजुरीकर बांधवांनी संपूर्ण कचरा गोळा केला. मोकळी जनावरे पठारावरती फिरत असतात. जनावराच्या पोटामध्ये हा प्लास्टिक कचरा जाऊ नये, म्हणून तात्काळ हा कचरा एकत्रित करण्यात आला. चौकट वनविभागानेही निसर्गपुजेत सहभागी व्हावे अशी अपेक्षा उपस्थितानी केली चौकट वृक्षबिया आणि भंडाऱ्याची उधळण करीत शेकडो भाविकांनी केली निसर्गाची पुजा श्री जानाई देवी मोफत अन्नदान सेवा पायी पालखी सोहळाच्या वतीने गेली वीस वर्ष सुरू आहे वनभोजनानंतर महिलांनी फेर धरत निसर्ग गाणी गायली.
भंडाऱ्याची उधळण करीत काउदरयावर ‘निसर्गपूजा’; हजारो भाविकांचा सहभाग, मार्तंड-जानाईदेवी पायी पालखीचा ‘जयाद्री ते सह्याद्री’ प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 16:10 IST