आगाशिवनगरात देवकर कॉलनीजवळ रस्त्याला तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:29 IST2021-06-01T04:29:59+5:302021-06-01T04:29:59+5:30
कराड-ढेबेवाडी मार्गावर पाणीच पाणी उपमार्ग जलमय मलकापूरसह परिसराला जोरदार पावसाने झोडपले लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूरसह परिसराला सोमवारी ...

आगाशिवनगरात देवकर कॉलनीजवळ रस्त्याला तलावाचे स्वरूप
कराड-ढेबेवाडी मार्गावर पाणीच पाणी उपमार्ग जलमय
मलकापूरसह परिसराला जोरदार पावसाने झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूरसह परिसराला सोमवारी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या जोराच्या पावसामुळे आगाशिव डोंगरावरून आलेल्या पाण्यामुळे आगाशिवनगरात देवकर कॉलनीजवळ रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर सर्वत्र पाणीच पाणी झाले, तर उपमार्ग जलमय झाले होते.
दोन दिवसांपासूनच उकाड्यात वाढ व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास ढग जमा होण्यास सुरुवात झाली. दुपारी तीनच्या सुमारास सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले होते. साडेतीनच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटास सुरुवात झाली. काही क्षणातच जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड तास पडलेल्या पावसामुळे कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. आगाशिव डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे आगाशिवनगरात देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती.
दीड तास जोरदार पावसाने झोडपल्याने उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते. जोरदार पावसामुळे उकाड्यापासून थोडा गारवा मिळाला. मात्र, आज झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. मलकापूर, कापिल, जखीणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, घेवडासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. लॉकडाऊनमुळे पिके शेतातच पडून आहेत. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे.
चौकट
प्रत्येक पावसात पवार वस्तीजवळ तळे
आगाशिव डोंगरावरून येणारा पावसाच्या पाण्याचा प्रवाह पवार वस्तीजवळ एकत्र येतो. त्यातच या परिसरातील नैसर्गिक ओढ्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे पावसाळी पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक पावसात आगाशिवनगरातील पवार वस्तीजवळ कराड-ढेबेवाडी रस्त्यावर तळे तयार होत आहे.
फोटो
आगाशिवनगरात सोमवारी झालेल्या पावसामुळे देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसरात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
310521\img_20210531_173926.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
सोमवारी जोरदार पावसाने झोडपल्यामुळे आगाशिवनगरात देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसरात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. (छाया-माणिक डोंगरे)