निसर्ग खुलला; पर्यटनस्थळे ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:10+5:302021-06-23T04:25:10+5:30

कऱ्हाड : निसर्गसौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या सह्याद्रीच्या रांगा आता हिरवाईची शाल पांघरून वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यातच कोरोना ...

Nature open; Destinations 'unlocked' | निसर्ग खुलला; पर्यटनस्थळे ‘अनलॉक’

निसर्ग खुलला; पर्यटनस्थळे ‘अनलॉक’

कऱ्हाड : निसर्गसौंदर्याने भरभरून उधळण केलेल्या सह्याद्रीच्या रांगा आता हिरवाईची शाल पांघरून वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यातच कोरोना संक्रमणाचा वेग कमी झाल्यामुळे प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली असून पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळत आहेत.

कऱ्हाडात प्रीतीसंगम, पी. डी. पाटील उद्यानासह अन्य काही बगीचे आहेत. त्याबरोबरच ऐतिहासिक पर्यटनस्थळेही तालुक्यात आढळून येतात. पाटण तालुका निसर्गसौंदर्याची खाण आहे. तालुक्यातील सह्याद्रीच्या सदाहरित डोंगररांगेत निसर्गाच्या जादूमय कुंचल्यातील जतन केलेला अनमोल ठेवा अनेकांना भुरळ घालत असतो. पावसाळा सुरू झाला की हिरवाईने नटलेल्या डोंगरकपारीतून फेसाळत वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे झुडपात लुप्त होत पायथ्याच्या दिशेने वाहताना दिसतात. या डोंगररांगांतील अंगाला झोंबणारा भन्नाट गार वारा आणि धुक्याची दुलई पांघणारा परिसर प्रत्येकाला स्वर्गसुखाचा अनुभव देऊन जातो. अशा आल्हाददायक वातावरणात न्हाऊन जाण्यासाठी हजारो पावले दरवर्षी पाटण तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या दिशेने वळत आहेत.

कोयना-नवजा मार्गाच्या एका बाजूला आकाशाला गवसणी घालणाऱ्या डोंगर टेकड्या, हिरवागार मखमली गालिचा पांघरलेला असून त्यावर हिरवाईतून डोकावणाऱ्या असंख्य श्वेतवर्णीय धारा व रंगीबेरंगी फुलझाडे, वेली लक्ष वेधून घेतात. तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री रांगांमधून पसरलेला शिवसागर जलाशय व त्यास रोखून ठेवणाऱ्या धरणाच्या भिंतीचे दर्शन याच ठिकाणाहून घडते. दूरवर जलाशयावरून पैलतीराच्या डोंगरापर्यंत आकाशाला बांधलेली काळ्या निळ्या ढगांची झालर मन मोहित करून टाकते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

- चौकट

कऱ्हाड, पाटणची पर्यटनस्थळे

१) बगिचे (फोटो : २२केआरडी०१ : नेहरू उद्यान)

प्रीतीसंगम, कऱ्हाड

पी. डी. पाटील उद्यान, कऱ्हाड

नेहरू गार्डन, कोयनानगर

फुलपाखरू उद्यान, भोसगाव

२) ऐतिहासिक (फोटो : २२केआरडी०२ : दातेगड)

आगाशिव लेणी, कऱ्हाड

वसंतगड, कऱ्हाड

सदाशिवगड, कऱ्हाड

जंगली जयगड, पाटण

भैरवगड, पाटण

रामघळ, हेळवाक

रामघळ, शिंगणवाडी

सुंदरगड, दातेगड

गुणवंतगड, पाटण

३) धार्मिक (फोटो : २२केआरडी०३ : येडोबा मंदीर)

कृष्णाबाई मंदीर, कऱ्हाड

येडोबा मंदिर, येराड

राम मंदिर, चाफळ

धारेश्वर, दिवशी

वाल्मिकी मंदीर

जोतिबा, जळव

शिवलेणे रुद्रेश्वर

जानुबाई, निवकणे

नाईकबा, सणबूर

४) धरण, प्रकल्प (फोटो : २२केआरडी०४ : कोयना धरण)

कोयना धरण

मोरणा-गुरेघर प्रकल्प

मराठवाडी प्रकल्प

उत्तरमांड प्रकल्प

तारळी प्रकल्प

खोडशी प्रकल्प

टेंभू प्रकल्प

५) धबधबा

ओझर्डे

पाबळनाला

ढाणकल

कोंढावळे

उलटा धबधबा

गाढवराई

६) महत्वाचे ‘पॉइंट’ (फोटो : २२केआरडी०५ : वाल्मिक पठार)

सडावाघापूर टेबललॅण्ड

डिंबा पॉईंट

नवजा टॉवर

वाल्मिक पठार

- चौकट

महत्वाच्या ठिकाणांचे अंतर

सातारा ते कऱ्हाड : २५

सातारा ते उंब्रजमार्गे पाटण : ६२

कऱ्हाड ते पाटण : ३०

पाटण ते कोयना : २४

कऱ्हाड ते ढेबेवाडी : २७

ढेबेवाडी ते वाल्मिकी : २५

(अंतर किलोमिटरमध्ये)

फोटो : २२केआरडी०७

कॅप्शन : पाटण तालुक्यातील कोयना विभागात असणारे धबधबे सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: Nature open; Destinations 'unlocked'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.