खटावमध्ये लसीकरण केंद्राबाहेर जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:19+5:302021-05-11T04:41:19+5:30

खटाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊनचा निर्णय घेतला असला तरी रुग्णवाढ ही कायम आहे. याच ...

The nature of the fair outside the vaccination center in Khatav | खटावमध्ये लसीकरण केंद्राबाहेर जत्रेचे स्वरूप

खटावमध्ये लसीकरण केंद्राबाहेर जत्रेचे स्वरूप

खटाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लॉकडाऊनचा निर्णय घेतला असला तरी रुग्णवाढ ही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेवर राज्य सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर याला ब्रेक लागत आहे.

खटावमध्ये गेल्या आठवड्यापासून फक्त तिसऱ्या टप्प्यातील १८ ते ४४ या वयोगटातील २०० लोकांचे लसीकरण सुरू आहे तर ४५ वर्षे वरील व्यक्तीचे लसीकरण वारंवार ठप्प होत आहे. लस येते; पण ती अल्पप्रमाणात येत असल्यामुळे तसेच लस आल्याचे कोणाला कळत नसल्यामुळे पहिला डोस घेणाऱ्यांना आपल्याला डोस मिळेल का याची धास्ती, तर पहिला डोस घेऊन ४५ दिवसांचा कालावधी उलटला असूनही लस मिळत नसल्यामुळे ही लस कधी मिळेल याची चिंता लागलेली आहे. त्यामुळे खटाव लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू असलेल्या या लसीकरण केंद्राच्या बाहेर लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.

लसीचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून १० एप्रिल रोजी पहाटे ६ वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर जत्रेचे स्वरूप आले होते. नागरिकांनी गर्दी करू नये, असे वारंवार वैद्यकीय अधिकारी व उपस्थितीत पोलीस यंत्रणेकडून सांगूनदेखील उपस्थित लोक त्याकडे काणाडोळा करत होते तर गर्दीमुळे या लसीकरण केंद्राच्या बाहेर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पहावयास मिळाला तर काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

लसीकरण केंद्राबाहेरील गर्दी ही चिंताजनक व कोरोना वाढविण्यासाठी नक्कीच पुरेशी आहे. अशा गर्दीतच जर एखादा कोरोनाबाधित असेल तर त्याची लागण होऊन त्याचा उद्रेक होण्यास कितीसा वेळ लागेल. त्यामुळे ज्याच्यासाठी हे लसीकरण सुरू आहे ते बाजूला राहील व भलत्याच प्रसंगाला तोंड द्यावे लागेल. म्हणून नागरिकांनी बोलावल्याशिवाय केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग रणदिवे यांनी केले आहे.

१०खटाव

कॅप्शन : खटावमध्ये ४५ वर्षांपुढील लसीकरणाच्या केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी होत आहे.

Web Title: The nature of the fair outside the vaccination center in Khatav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.