‘राष्ट्रवादी-भाजप’ युतीमुळे कलाटणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:52 IST2017-08-09T23:52:22+5:302017-08-09T23:52:24+5:30

'Nationalist-BJP' coalition alliance ... | ‘राष्ट्रवादी-भाजप’ युतीमुळे कलाटणी...

‘राष्ट्रवादी-भाजप’ युतीमुळे कलाटणी...



सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी भाजपशी मिळते-जुळते घेत भाजपशी घरोबा करुन जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत आपले संख्याबळ वाढविले. निवडणुकीतील ४0 पैकी तब्बल ३0 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविणारा राष्ट्रवादी नियोजन समितीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
नगरपंचायत व नगरपालिका या दोन मतदारसंघातील सात जागांसाठी भाजपने राष्ट्रवादीला सहकार्य करायचे, त्याबदल्यात भाजपला जिल्हा परिषद मतदारसंघातील तीन जागा देण्याचा अलिखित करार झाला होता. जिल्ह्यासाठी हे समीकरण नवे असले तरीही काँगे्रससह, खासदार उदयनराजे भोसले, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांचा वारु रोखण्याच्या दृष्टिने ते महत्त्वाचे पाऊल ठरले. राष्ट्रवादीला विरोध करणाºया सातारा विकास आघाडी व शिवसेना या दोन पक्षांचे अक्षरश: पानिपत झाले. सातारा विकास आघाडीने नगरपालिका मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, हे प्रयत्न पूर्णत: धुळीला मिळाले. विरोधकांची मोट एकसंध राहिली नसल्याने विरोधकांचे शहरात असणारे वर्चस्वही त्यांच्यासाठी उपयोगी ठरले नाही. तर नगरपालिकांमध्ये असणारे भाजपचे बळ राष्ट्रवादीला मिळून नगरपंचायती व नगरपालिका मतदारसंघांवर राष्ट्रवादीने प्राबल्य मिळविले.
नगरपालिका मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक विनोद उर्फ बाळू खंदारे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला. या विजयानेच राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केलेल्या सोयरिकीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे समोर आले. ‘लोकमत’ने या पूर्वीच मांडलेल्या अंदाजानुसार जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या रेश्मा शिंदे, मनोज घोरपडे, सुवर्णा देसाई यांना मदत करून राष्ट्रवादीने नगरपंचायत व नगरपालिका हे अख्खे दोन मतदारसंघ आपल्या खिशात टाकले.
विजयानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: जल्लोष केला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीदेखील करण्यात आले. शहरात जागोजागी गुलालाचा खच साठलेला पाहायला मिळत होता.
१९९९ पासून जिल्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीला आजवर काही प्रमाणात आव्हान उभे करीत आलेल्या काँग्रेसपाठोपाठ आता जिल्ह्यात भाजपही बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपशी जुळवून घेण्यास सुरूवात केल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ठळकपणे दिसून आले.
चोरगेंचा विजयी जल्लोष पण... साळुंखेंच्या हाती नियुक्तीपत्र
समसमान मते मिळालेल्या साविआच्या अनिता चोरगे व दीपाली साळुंखे यांच्यातील जेतेपदाची अनोखी रस्सीखेच मतमोजणीवेळी पाहायला मिळाली. पहिल्या मतमोजणीत दोघींना समान मते मिळाल्याने लॉटरी (चिठ्ठी) चा कौल चोरगे यांच्या बाजूने लागला. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसह विजयी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलालही उधळला.
मात्र, राष्ट्रवादीने या विजयावर हरकत घेतल्याने पुनर्रमतमोजणी करण्यात आली. त्यात पराभूत ठरविलेल्या दीपाली साळुंखे विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी त्यांच्या विजयाची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. चोरगेंच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आनंद काही काळापुरताच ठरला.

...अन भादेतून गाडी
पुन्हा माघारी फिरली!
पराभूत झाल्याची सल मनात धरून दीपाली साळुंखे व त्यांचे कार्यकर्ते आलेल्या वाहनातून परत खंडाळा तालुक्यातील त्यांच्या भादे गावाकडे परतले; परंतु, घरात पोहोचतायत तोच त्यांना राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांचा फोन आला. ‘अहो, निकालानंतर तुम्ही परत कशा गेलात...परत निघा निकालावर हरकत घ्यायची आहे, आम्ही सर्व प्रोसेस केली आहे, तुम्ही तत्काळ निघा...’, असा निरोप मिळताच दीपाली साळुंखे पुन्हा साताºयात दाखल झाल्या. फेरमतमोजणीचा कौल त्यांच्या बाजूने लागल्याने रुसलेले कार्यकर्त्यांच्या चेहºयावर क्षणार्धात हसू फुलले.

घोरपडे-देशमुखांची
अनोखी हॅटट्रिक
भाजपचे मनोज घोरपडे हे जिल्हा नियोजनवर निवडून आले. त्याआधी त्यांचे वडील भीमराव घोरपडे व आई मंगला घोरपडे हेही जिल्हा नियोजनचे सदस्य होते. तर सातारा विकास आघाडीच्या अर्चना देशमुख या आधी सरपंच म्हणून दुसºया जिल्हा परिषद सदस्या म्हणून तर आता जिल्हा नियोजन समिती सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत. घोरपडे व देशमुख यांच्या हॅटट्रिकची निकालानंतर चांगलीच चर्चा रंगली होती.

Web Title: 'Nationalist-BJP' coalition alliance ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.