खाकी अंगावर चढविणाऱ्या ‘नकुसा’ला व्हायचंय ‘संध्या’

By Admin | Updated: June 29, 2014 00:27 IST2014-06-29T00:27:02+5:302014-06-29T00:27:58+5:30

पोलीस भरतीत अव्वल : ‘नकोशी’ म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन

'Nakusa' who wants to take khaki on face | खाकी अंगावर चढविणाऱ्या ‘नकुसा’ला व्हायचंय ‘संध्या’

खाकी अंगावर चढविणाऱ्या ‘नकुसा’ला व्हायचंय ‘संध्या’

सातारा : तीन मुलींनंतर चौथीही मुलगीच झाल्यानं ‘ती’चं अस्तित्व खुपणाऱ्या लोकांनी वेळोवेळी चिमटं काढलं. कुणी वंशाला दिवा पाहिजे, असं टोमणं मारलं, तर कुणी आईबापाच्या डोक्यावर ओझं वाढलं म्हणून हिणवलं; पण वंशाच्या दिव्यापेक्षा काकणभर जास्तच उजळून निघालीय उंबरमळे येथील ‘नकुसा धोंडिराम वलेकर.’ नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत तिनं अव्वल स्थान पटकावून ‘नकोशी’ म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घातलंय. अंगावर खाकी चढविणाऱ्या ‘नकुसा’ला आता व्हायचंय ‘संध्या’ वलेकर.
खटाव तालुक्यातील उंबरमळे हे दुष्काळी गाव. येथील वलेकर दाम्पत्याला तीन मुली. वंशाला दिवा असावा, अशी त्यांची आशा; पण तीन मुलींनंतर चौथीही मुलगीच झाली. शेजार-पाजाऱ्यांनी नको असलेली मुलगी म्हणून हिणवले. पुढे नकोशी झालेल्या मुलीची ‘नकुसा’ झाली. शेजार-पाजाऱ्यांनी हिणवलेल्या या ‘नकुसा’नं स्वकर्तृत्वानं आपलं घर उजळून टाकलंय पण आता तिला ‘नकुसा’ नाव पुसून ‘संध्या’ हे नाव धारण करावयाचे आहे. एक वर्षापूर्वी ‘नकुसा’ हे नाव बदलण्यासाठी घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ती सहभागी झाली होती. पण अद्याप नावात बदल झालेला नाही. आप मतलबी राजकारण अन् प्रशासकीय उदासीनता यामुळे तिचे ‘नकुसा’ हे नाव अद्याप पुसले गेले नाही. ती ‘संध्या वलेकर’ असे नामकरण केलेले गॅझेट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
घरात अठरा विश्व दारिद्र्य, उदरनिर्वाहासाठी मेंढ्यांचा कळप घेऊन गावोगावी फिरणारे मायबाप. कुटुंबात आई, वडील, एकटा भाऊ, तीन बहिणी. तिन्ही बहिणींही विवाहित आहेत. नकुसाचे प्राथमिक शिक्षण उंबरमळे येथे, माध्यमिक शिक्षण कटगुण येथे तर अकरावी व बारावीचे शिक्षण पुसेगाव येथे झाले. बारावीनंतर सातारा येथून ‘डीएड’चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘एलबीएस’ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच वेगळं काहीतरी करायचं, असे नकुसाला वाटत होते. दरम्यानच्या काळात तिने पोलीस भरतीत उतरायचे ठरविले. यासाठी महिन्यापूर्वीच साताऱ्यातील एका अ‍ॅकॅडमीत प्रवेश घेऊन भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवातही केली. त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या भरतीत तिने प्रथम क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल नकुसा सांगते की, पूर्वी आमचा मेंढीपालनाचा व्यवसाय होता. आई-वडील मेंढ्या घेऊन गावोगावी फिरायचे. माझा जन्म कोरेगावातील मंगळापूर या गावी झाला. तिन्ही मुलींवर चौथीही मुलगीही झाल्याने शेजारचे लोक मला ‘नकुसा’ म्हणू लागले. पण माणूस नावाने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो, यावर माझा विश्वास आहे. मी मिळविलेल्या यशात माझ्या आई-वडिलांची मोलाची साथ मिळाल्याचे नकुसाने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Nakusa' who wants to take khaki on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.