नागठाणेकरांना मिळणार निर्जंतुक पिण्याचे पाणी
By Admin | Updated: February 10, 2015 00:28 IST2015-02-09T21:05:47+5:302015-02-10T00:28:41+5:30
जलस्वराज्य योजनेतून कामपूर्ती : प्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

नागठाणेकरांना मिळणार निर्जंतुक पिण्याचे पाणी
नागठाणे : सातारा तालुक्यातील सातारा शहरानंतर सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नागठाणे, ता. सातारा गावाला गेले अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. त्यामुळे गावच्या विकासावर परिणाम झाला होता. पण आता नागठाणेकरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने आनंदाचे वातावरण दिसत आहे.काही वर्षांपूर्वी जलस्वराज्याच्या या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी गावाला देण्याकरिता काही लोक प्रतिनिधींनी ही योजना राबविण्याकरिता अथक प्रयत्न केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही योजना पूर्णत्वाकडे गेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी ही योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय ग्रामसभेत होऊन या कामाने गती घेतली. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांना स्वच्छ, निर्जंतुक, पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नागठाणे हे गाव सुमारे ६१ गावांचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे अनेक योजना राबविण्याच्या सर्व पातळीवर प्रयत्न झाला. दुर्दैवाने या सर्व योजनांमध्ये काहीना काहीतरी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार? हा एकच सवाल सर्व स्तरातील नागरिक वारंवार लोकप्रतिनिधीसमोर उपस्थित करत होते. दरम्यान, जलस्वराज्य ही योजना जलसंजिवनीप्रमाणे शासनाने अंमलात आणली आणि नागठाणे गावच्या लोकप्रतिनिधी ही योजना राबवून नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी दृढ निश्चय केला. त्यानुसार अथक प्रयत्नातून लोक सहभाग घडवून आणला. पाणीसाठा करण्याकरिता उरमोडी नदीवर बंधाराही बांधण्यात आला. बंधारा बांधल्यानंतर फार मोठा पाणी साठाही झाला. त्या पुढाकाराने ग्रामसभेत पूर्वीच्या कामाचे आॅडिट करून पंचायतीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. पंचायतीच्या सर्व सदस्यांनी हा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या कृतीतून दर्शविले. जलस्वराज्याच्या कामाने प्रचंड गती घेतली असून येणाऱ्या काही दिवसांत नागठाणे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न मार्गी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने कोणत्या राजकीय गटाला फायदा मिळेल, हे महत्त्वाचे नसून त्यांच्या हक्काचे स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणार आहे. (वार्ताहर)
ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. म्हणूनच नागठाणेतील सर्व गटांच्या नेतृत्वाचे पुढाकार घेतला आणि या पुढाकारातून जलस्वराज्य प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचे ठरविले हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.
- प्रवीण साळुंखे, सरपंच