नगर पंचायतीच्या व्यवसाय परवान्याला आचारसंहिताच नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:23+5:302021-09-07T04:47:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांच्या आसपास असून, शहरात नागरी ...

नगर पंचायतीच्या व्यवसाय परवान्याला आचारसंहिताच नाही...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांच्या आसपास असून, शहरात नागरी सुविधांची वानवा तर आहेच. परंतु, शहरातील हॉटेल व्यवसायासह इतर व्यवसायातील ग्राहकांच्या सोयी-सुविधांचा अभाव सदृश्य चित्राद्वारे दिसून येत आहे. त्यामुळे नगर पंचायत परवान्याला आचारसंहिताच नसल्याचे स्पष्ट होत आहे.
वडूज ग्रामपंचायतीची साडेचार वर्षांनंतर नगर पंचायत झाली. नागरिकांच्या नगर पंचायत स्थापनेनंतर सुविधा आणि विकासासंदर्भात अपेक्षा वाढल्या. दैनंदिन सुविधांबरोबर इतर आवश्यक सेवेसाठी नगर पंचायत प्रशासनाकडून पूर्तता होईल, असे येथील नागरिकांना वाटत होते. शहराची झपाट्याने होणारी वाढती व्याप्ती पाहता आणि तालुक्याचे मुख्यालय असल्यामुळे व्यवसायासाठी संधी निर्माण झाली होती.
वडूज शहरात सुमारे १८० हॉटेल्स, ७० कापड दुकाने, ९० लहान-मोठी किराणा दुकाने, ४० स्टेशनरी दुकाने यासह अनेक व्यवसाय सुरू आहेत. वास्तविक पाहता या व्यवसायादरम्यान इमारतीमध्ये ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही हिताचा निर्णय घेतलेला दिसून येत नाही. प्रामुख्याने हॉटेल, धाबे याठिकाणी अन्न व भेसळ प्रशासनाच्या नियमानुसार व्यवसाय इमारती ठिकाणी शौचालय व इतर सोयी-सुविधा असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, अन्न व भेसळ प्रशासनाकडून याबाबत कोणतीच स्थळ पाहणी केलेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायत प्रशासनाकडूनही साडेचार वर्षे लोटली तरी शहर स्वच्छ सर्वेक्षण समन्वयकाची नेमणूकच झाली नसल्याने नाममात्र दोनशे रुपये फीमध्ये व्यवसाय परवाना दिला जात आहे. व्यवसाय इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणेचीही सोय नसल्याचे जाणवते. अन्न व भेसळ प्रशासनाकडून ऑनलाईन व्यवसाय परवाना एक, तीन व पाच वर्षांसाठी प्राप्त होतो. परंतु, या विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यवसाय परवाना देण्यापूर्वी व्यवसाय इमारत पाहणी झालेली दिसून येत नाही. स्थळ पाहणीसाठी आले तरी कागदोपत्री पर्यायी व्यवस्था करून हे अधिकारी जिल्हा रवाना होत आहेत.
शहरामध्ये मोठमोठे व्यवसाय उभे असून, महाविद्यालय, शाळा, दवाखाने व मंगल कार्यालयांची संख्या अधिक आहे. त्या पटीत ग्राहक व रुग्णांसाठी सुविधा देण्याबाबत संबंधित गांधारीच्या भूमिकेत आहेत. यावर ग्राहकांनीदेखील न्याय हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक तर आहेच. परंतु, संबंधित प्रशासनाचा कानाडोळा ग्राहकांच्या सोयी-सुविधांच्या हक्कावर गदा आणत आहे.
- प्रतिक्रिया ...
तालुक्याच्या शेवटच्या गावातून चाळीस किलोमीटर अंतरावरून वडूज शहरात कामानिमित्त यावे लागते. यावेळी वडूज शहरात दिवसभर थांबून कामकाजाचा निपटारा करतो. यादरम्यान नाष्टा किंवा जेवण करण्यासाठी गेलो असता, शौचालय आणि अन्य सुविधांचा अभाव जाणवतो.
- मारुती पवार, ग्राहक
फोटो ओळ .. वडूज शहराचा गुगल मॅप फोटो ( शेखर जाधव )
___