मनंं दुभंगली... डझनभर डोकी फुटली!
By Admin | Updated: February 23, 2015 00:22 IST2015-02-22T22:30:18+5:302015-02-23T00:22:03+5:30
कौंदणी गावची चित्तरकथा : यात्रेच्या जल्लोषानंतर दबलेला कलह उफाळून रक्तरंजित संघर्ष

मनंं दुभंगली... डझनभर डोकी फुटली!
सातारा : ‘आमच्याकडून सुरुवात झाली नाही,’ असं म्हणून एकमेकांकडे बोट दाखवणारे दोन गट मनातल्या मनात धुमसताना दिसतायत.... डझनभर डोकी फुटूनसुद्धा! मनं दुभंगल्यामुळं गावची माती लालेलाल झालीय. कमावतं पाऊल मनानं मुंबईत पोहोचलंय; पण आप्तांची काळजी घेणारं दुसरं पाऊल गावच्या मातीत रुतलंय. यात्रा संपलीय. मुंबईवाले निघालेत; पण गावचं दुभंगलेपण त्यांच्याही आधी मुंबईत पोहोचलंय!कौंदणी. सातारा तालुक्यात पिलाणीजवळ डोंगरावर वसलेलं गाव. शनिवारी रात्री गावात मीटिंग झाली. एक गट मीटिंगला आलाच नाही. दुसऱ्या गटानं सांगावा धाडला. पण घडलं भलतंच. अचानक माणसं एकमेकांवर धावून गेली. गडद अंधारात काठ्या, दगड (आणि काही ग्रामस्थांच्या मते धारदार शस्त्रेही) चालली. बायाबापड्याही मध्ये पडल्या. त्यांनाही जखमा झाल्या. यात्रेत गुलाल उधळल्यानंतर मीटिंगच्या दिवशी चक्क मिरचीपूड उधळली गेली एकमेकांच्या डोळ्यात. काय घडतंय हे समजायच्या आत आक्रोशाने गावचा आसमंत व्यापला. एक ना दोन, तब्बल २१ जण जखमी झाले. नंतर गाड्या सुसाट निघाल्या. जखमांनी तळमळणारी माणसं कोंबून-कोंबून गाड्यांमध्ये बसलेली. तेव्हापासून गाव ओस पडलंय आणि बहुतांश गावकरी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ताटकळतायत. अनेकांना टाके पडलेत. डोकी फुटलेल्यांचं ‘सीटी स्कॅन’ करावं लागलंय. त्यासाठी खासगी हॉस्पिटलच्या वाऱ्या दिवसभर सुरू. या ‘कुरुक्षेत्रा’चं कारण काय? सगळ्यांची वेगवेगळी उत्तरं!
गावकऱ्यांच्या बोलण्यातून समजलं की, काही वर्षांपूर्वी असाच संघर्ष टिपेला पोहोचला होता; पण तीन वर्षांपूर्वी एका मंचावर येऊन तो मिटवला गेला. पण मनं शिवली गेली नाहीत. काही ना काही कारणांनी धुसफूस कायम राहिली. कुणी जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांकडे बोट दाखवतो, तर कुणी ‘मंडळाची जमीन’ कुणाच्या नावावर करायची यावरून वाद वाढल्याचं सांगतो. या वादावादीत गावच्या चांगल्या गोष्टी एक तर दुर्लक्षित राहिल्या किंवा संपून गेल्या.
पुढाकार घेऊन आयोजित केलेली रोगनिदान शिबिरं गटबाजीत कोमेजून गेली. मंदिराचं शिखर बांधण्याचं काम कुणी केलं, कळस कुणी चढवायचा, अशा कारणांवरून वाद विकोपाला जात राहिले. पोलीस ठाण्याची पायरीही काही वेळा चढावी लागली. कोर्टाचे खेटे झाले. खुल्या मंचावर वाद मिटवणारं कौंदणी गाव आतून पोखरत राहिलंं.
मनामनातलं अंतर वाढत राहिलं. दोन्ही गटांमधले मुंबईवाले यात्रेचा आनंद लुटायला गाड्या घेऊन आले; पण शरीर-मनावर जखमा घेऊन बसले. (प्रतिनिधी)
गावच्या गाळ्यातली घुसमट
एकशे दहा उंबरठ्याच्या गावात घडणाऱ्या घडामोडी मुंबईपर्यंत गाववाल्यांचा पाठलाग करतात. एक तृतीयांश लोकसंख्या मुंबईत राहते. त्यातले बहुतांश एकाच ठिकाणी... गावच्या गाळ्यात! काही जण स्वतंत्रही राहतात; पण अशा रीतीनं स्वतंत्र होण्यामागेही गावातली खदखद असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. अनेकांचा टॅॅक्सीचा व्यवसाय. काही जण नोकरी करतात. गावच्या गाळ्यात दोन्ही गटांची माणसं. पण गावची यात्रा, त्यातले हिशोब, कार्यक्रमातले मानापमान, जमिनींचे व्यवहार या विषयांनी तीनशे किलोमीटरवर महानगरीतही त्यांची पाठ सोडलेली नाही. कष्टकऱ्यांनी थकल्यावर जिथं पाठ टेकायची, तो ‘गावचा गाळा’ही यामुळं घुसमटलाय.