वडिलांनी राष्ट्रगीत पाठ करून घेतले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST2021-08-15T04:39:48+5:302021-08-15T04:39:48+5:30
संडे स्पेशल स्टोरी सचिन काकडे भारत स्वातंत्र्य होताच सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. ठिकठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. ...

वडिलांनी राष्ट्रगीत पाठ करून घेतले..
संडे स्पेशल स्टोरी
सचिन काकडे
भारत स्वातंत्र्य होताच सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. ठिकठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत होता. राष्ट्रगीत अंगात नवचेतना जागृत करत होते. त्या आठवणी आजही मनाला आनंद देऊन जातात. असे सांगतानाच साताऱ्यातील ज्येष्ठ कर सल्लागार व चित्रपट निर्माता अरुण गोडबोले यांनी स्वातंत्र्यदिन व त्यानंतरच्या काही आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले, भारताला स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळाले नाही. यासाठी अनेक वर्ष आपल्याला ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष करावा लागला. स्वातंत्र्याच्या लढाईत अनेक शूरवीरांना प्राणाची आहुतीदेखील द्यावी लागली. यानंतर कुठे भारत ब्रिटिशांच्या बेडीतून मुक्त झाला. आज या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मी अगदी तीन वर्षांचा होतो. माझे वडील रा. ना. गोडबोले स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्यापूर्वी व त्यानंतर घडलेल्या काही घटना त्यांनी मला सांगितल्या होत्या. काही घटना आजही माझ्या स्मरणात आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवीच्या मंदिराजवळ दरवर्षी १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज फडकवला जायचा. ही प्रथा अनेक वर्ष सुरू होती. मी वडिलांसोबत स्वातंत्र्यदिनाला येथे जात असे. साताऱ्यातील आत्ताची गोलबाग ही पूर्वी जवाहर बाग म्हणून ओळखली जायची. या बागेतदेखील दर वर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असे. येथेही मी न चुकता जायचो. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे वडिलांनी माझ्याकडून राष्ट्रगीत पाठ करून घेतलं होतं. तेही वयाच्या चौथ्या वर्षी. त्या काळी नेहरू शर्ट, गांधी टोपी, जॅकेट असा मुलांचा पेहराव प्रसिद्ध झाला होता. असाच पेहराव करून वडील मला ध्वजारोहनासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर ते मला हुबळी नावाच्या कलेक्टर साहेबांकडे घेऊन गेले. वडिलांनी त्यांना आवर्जून सांगितले की ''हा माझा मुलगा आहे आणि हा राष्ट्रगीत गातो'' कलेक्टरांनी मला लगेचच राष्ट्रगीत गायला सांगितले आणि मी गाऊन दाखविले. कलेक्टर साहेब जितके आनंदी झाले त्याहून अधिक आनंद माझ्या वडिलांना झाला होता. कलेक्टरांनी मला बक्षीस म्हणून चॉकलेट खाऊ दिला. त्यानंतर वडील मला जवाहर बागेजवळ असलेल्या किरण कलामंदिर नावाच्या एका फोटो स्टुडिओत घेऊन गेले. तिथे त्यांनी माझा ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून घेतला. तो फोटो मी आजही संग्रहित करून ठेवला आहे. हा फोटो पाहिला की जुन्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या होतात.
चौकट :
तुला स्वातंत्र्याची किंमत नाही का..
राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी उतरवणे क्रमप्राप्त आहे. हे वडिलांनी ठणकावून सांगितले होते. या नियमांचे मी काटेकोर पालन करत होतो; परंतु एकदा चुकून राष्ट्रध्वज खांबावरून उशिरा उतरविला गेला. ही गोष्ट जेव्हा वडिलांना समजली तेव्हा त्यांनी मला खडेबोल सुनावले होते. ‘तुला स्वातंत्र्याची किंमत नाही का’ हे वडिलांचे शब्द मला आजही आठवतात. जसजसा काळ बदलत गेला तसतशा काही जुन्या आठवणी विस्मृतीत गेल्या. मात्र माझ्या आठवणीतला स्वातंत्र्यदिन मी कधीच विसरू शकत नाही, असे अरुण गोडबोले यांनी सांगितले.
दोन फोटो मेल