जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर
By Admin | Updated: July 6, 2016 00:24 IST2016-07-05T23:31:12+5:302016-07-06T00:24:45+5:30
अशोकराव गायकवाड : रामदास आठवले यांच्या निवडीने पक्षाला बळकटी

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर
कऱ्हाड : ‘जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. मित्रपक्षासोबत काम करत असताना त्यांनी आम्हाला सतत नाराज केले आहे. मध्यंतरी शासनाच्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवेळीही मित्रपक्षांनी आम्हाला डावलले. त्यामुळे आता आगामी जिल्ह्यातील पालिका निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळात निवड झाल्यामुळे पक्षाला नवे बळ मिळाले आहे. जिल्ह्यात याचा जल्लोष साजरा केला जात आहे,’ अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद गायकवाड, मधुकर आठवले, अशोक मदने, नितीन आवळे, संतोष संपकाळ, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ रोकडे, सचिन वायदंडे आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला निर्णय हा खरोखरच योग्य आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यातील दलित समाजबांधवांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आता निवडीमुळे त्यांना देशासाठी कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे दलित बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सातारा येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे.
जिल्ह्यात आरपीआय पक्षाला बळकटी देण्यासाठी लवकरच कार्यकारीमध्ये बदल केले जाणार आहेत.
आरपीआयचे जिल्ह्यात सातारा, वाई, महाबळेश्वर, रहिमतपूर नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहोत. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत जागा निवडून आणणार आहे, अशी माहिती अशोकराव गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)