आखाडेमुऱ्यावर महावितरणकडून विद्युत तारा दुरुस्तीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:21+5:302021-06-20T04:26:21+5:30
पेट्री : कासपठार परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा (जावली) येथील आखाडेमुऱ्यावर वळीव व चक्रीवादळाच्या वादळी मुसळधार पावसाने वीजवाहक विद्युत ...

आखाडेमुऱ्यावर महावितरणकडून विद्युत तारा दुरुस्तीस सुरुवात
पेट्री : कासपठार परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा (जावली) येथील आखाडेमुऱ्यावर वळीव व चक्रीवादळाच्या वादळी मुसळधार पावसाने वीजवाहक विद्युत तारा हात लागेल एवढ्या अंतरावर खाली आल्या होत्या. त्यामुळे स्थानिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. विद्युत खांब डोंगरावर घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांसह बैलांचा वापर केला जात आहे.
गेल्या महिनाभरात मान्सूनपूर्व पाऊस व तौक्ते चक्रीवादळाच्या सोसाट्याच्या वाऱ्याने काही ठिकाणी विजेचे खांब वाकून, झाडे उन्मळून मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. आखाडेमुऱ्यावर या वादळी पावसाचा जोरदार फटका बसून साधारण सात-आठ विजेचे खांब वाकले. वीजवाहक तारांचा ताण कमी होऊन खाली आल्या होत्या. विद्युत खांबावर चढता येत नसल्याने महावितरण कर्मचाऱ्यांकडून एकमेकात गुंतलेल्या तारा बांबूच्या कामटीने वेगळ्या करून त्याला आधार देत विजेचा पुरवठा सुरू केला होता. पुन्हा मान्सूनपूर्व पावसामुळे या विद्युत तारा हाताच्या अंतरावर खाली आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये सोमवार, दि. १४ जूनच्या अंकात बातमी प्रकाशित केली होती. याची दखल घेऊन महावितरणकडून नवीन दहा विद्युत खांब वाहतुकीचे व बसविण्याचे तसेच लाईन ओढण्याच्या कामास वेगाने सुरुवात केली आहे.
कोट
डोंगरमाथ्यावर अतिपर्जन्यवृष्टी असते. खाली आलेल्या विद्युत तारेखालून जनावरांची, ग्रामस्थांची सतत वहिवाट असते. सततच्या वाऱ्यामुळे ताण कमी होऊन हात लागेल एवढ्या अंतरावर विद्युत तारा आल्यामुळे विजेचा धक्का बसून एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता अधिक होती. सध्या या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने महावितरणकडून उपाययोजनेस सुरुवात झाली आहे.
- ज्ञानेश्वर आखाडे,
आखाडेमुरा, ता. जावळी
चौकट
मुख्य डांबरी रस्त्यापासून साधारण अडीच किलोमीटरच्या कच्च्या रस्त्यावरून भर पावसात डोंगर चढत महावितरणचे कर्मचारी तसेच बैलांच्या साह्याने व ग्रामस्थांच्या सहकार्याने दहा विद्युत खांब डोक्यावरून वाहून नवीन खांब रोवण्याचे व लाईन ओढण्याचे काम सुरू झाले आहे.
फोटो १९पेट्री-ईलेक्ट्रीसिटी
आखाडेमुरा (ता. जावळी) येथे महावितरण कर्मचारी तसेच बैलांच्या साह्याने व ग्रामस्थांच्या डोक्यावरून चिखलातून विद्युत खांबाची वाहतूक केली जात आहे.
(छाया : सागर चव्हाण )