आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 17:44 IST2021-12-20T17:42:06+5:302021-12-20T17:44:19+5:30
शिवेंद्रसिंहराजेंनी नारळफोड्या गँग असा उल्लेख करत उदयनराजेंवर टीका केली होती. या टीकेला उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आम्ही नारळ फोडले; पण कुणाची घरं फोडली नाहीत, उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर जहरी टीका
सातारा : ‘नारळफोड्या गँग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो; परंतु तुम्ही काय केले. ज्या लोकांनी स्वत:च्या आयुष्याची पुंजी मोठ्या विश्वासाने तुमच्या बॅँकेत ठेवली. त्यांची आज काय अवस्था आहे. आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत, कोणाचे वाटोळेही केले नाही,’ अशी जहरी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता केली.
कास (ता. सातारा) येथे बामणोली रस्ता भूमिपूजन, कास धरणाची घळभरणी आणि पाणी सोडण्याच्या स्वयंचलित गेटचे पूजन रविवारी सकाळी खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आमदारांच्या टीकेवर जोरदार प्रहार केला. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, सुहास राजेशिर्के, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ॲड. डी. जी. बनकर यांच्यासह प्राधिकरण, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, ‘टीका जरूर करावी; पण आपण काय बोलतो याचे भान जरूर ठेवायला हवे. आमचा नारळफोड्या गँग असा उल्लेख करण्यात आला. होय, या नारळफोड्या गँगचा आम्हाला अभिमान आहे. कारण आम्ही लोकहिताची कामे करतो आणि त्याचे नारळ फोडतो. लोकांनी आमच्यावर, आमच्या आघाडीवर जो विश्वास ठेवला आहे त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. संकुचित वृत्तीच्या व दिशाहीन झालेल्या लोकांकडून आम्ही काय अपेक्षा ठेवणार.
आघाडीचे सदस्य मनाने, विचाराने एकत्र
थोरले प्रतापसिंह महाराज यांनी कास तलाव बांधून सातारकरांची तहान भागविली. शहराचा विस्तार वाढत गेल्याने पाण्याची गरजही अधिक भासूू लागली. त्यामुळे कास तलावाच्या उंची वाढीचे काम हाती घेतले. हे काम लवकरच मार्गी लागेल. सातारा विकास आघाडीतील सर्व सदस्य मनाने व विचाराने एकत्र आहेत, त्यात कोणतीही फूट पडणार नाही, असेही यावेळी खा. उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे म्हणाले...
- त्यांचे वय वाढले; पण बुद्धी लहान होत गेली.
- दिशाहीन झालेले वैयक्तिक पातळीवर टीका करतात.
- अशा संकुचित लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार.
- घरफोड्या लोकांनी मागे वळून पाहावं त्या लोकांची काय अवस्था झालीय.
- निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही जाहीरनामा काढत नाही वचननामा काढतो.
-वचननाम्याची सर्व कामे आम्ही मार्गी लावली याचे समाधान वाटते.