निरोगी सोनुल्यासाठी मातांचीही परीक्षा
By Admin | Updated: December 19, 2015 01:07 IST2015-12-19T01:02:07+5:302015-12-19T01:07:47+5:30
उंब्रजमध्ये आयांचा निश्चय : मातांसाठी परीक्षा अन् पोषण आहार स्पर्धा

निरोगी सोनुल्यासाठी मातांचीही परीक्षा
अजय जाधव, उंब्रज : शाळा... ही विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. विद्यार्थी शिक्षणात प्रगत होत असताना त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांचीच असते. आहार का घ्यावा?, कशा प्रकारे घ्यावा, कसा घ्यावा? यासाठी पालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून उंब्रज येथील होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मातांची परीक्षा घेतली. व त्यातून विजेतेही जाहीर करण्यात आले.
बदलत्या काळानुसार विद्यार्थी शिक्षणात प्रगत होण्यासाठी पालक प्रयत्न करत असतात. गुणवत्ता वाढीसाठी शाळांबरोबरच खासगी शिकवण्याही लावल्या जातात. शिक्षणाबाबत पालक जेवढे जागरुक असतात, तेवढी जागरुकता त्यांच्या खाण्या-पिण्याच्या बाबतीत असत नाही, हे समोर येत आहे.त्यांना योग्य वयात योग्य आहार देणे; पण त्याचबरोबर तो आहार कसा असावा, त्यामध्ये काय असावे, काय नसावे, कसा बनवला पाहिजे, यासाठी विद्यार्थ्यांच्या मातांची पाककला स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांना व्हेज पुलाव, व्हेज पराठा यापैकी एक पदार्थ, स्वीटडिश बनविण्यासाठी सांगितले गेले होते. त्या पद्धतीने सर्व स्पर्धकांनी घरातून सकस आहाराचे पदार्थ तयार करून आणले होते.
या अनोखी स्पर्धेसाठी वर्षाराणी जाधव, कमल जाधव, हेमलता गोळे, वैशाली चव्हाण, अंजुम मुजावर यांनी प्रयत्न केले.