मुलाच्या आधार कार्डसाठी मातेचा आत्मदहनाचा इशारा-आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:22 IST2019-02-27T23:19:31+5:302019-02-27T23:22:44+5:30
मुंबई येथे अॅव्हिएशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पळशी, ता. माण येथील अभिषेक आनंदा गंबरे या विद्यार्थ्याला आधार नोंदणी केल्यानंतर सहा वर्षे उलटले तरी आधार कार्ड मिळाले नाही.

मुलाच्या आधार कार्डसाठी मातेचा आत्मदहनाचा इशारा-आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार
पळशी : मुंबई येथे अॅव्हिएशन टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पळशी, ता. माण येथील अभिषेक आनंदा गंबरे या विद्यार्थ्याला आधार नोंदणी केल्यानंतर सहा वर्षे उलटले तरी आधार कार्ड मिळाले नाही. शासन दरबारी हेलपाटे मारूनही दाद मिळत नाही. अखेर हताश झालेल्या अभिषेकच्या आईने चक्क
शासनाने सुरू केलेल्या‘आपले सरकार’ या तक्रार निवारण पोर्टलवर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
दहिवडी येथे दि. १ डिसेंबर २०१३ रोजी पळशी येथील जयश्री गंबरे, त्यांचा मुलगा ओंकार गंबरे व अभिषेक गंबरे या तिघांनी एकाचवेळी आधार नोंदणी केली होती. नोंदणीनंतर त्यांना रितसर पावती देण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यांत जयश्री गंबरे व भाऊ ओंकार गंबरे यांचे आधार कार्ड आले; पण अभिषेक गंबरे याचे आधार कार्ड न आल्याने त्यांनी आधार नोंदणी केंद्र्रात चौकशी केली. तेथे आधार नोंदणीची पावतीही दाखविली. आधार प्रक्रिया आॅनलाईन असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी जुन्या पावतीच्या आधारे पाहिले असता ‘रिजेक्टेड डाटा प्रोसेस एरर’ असा मेसेज येत असल्याचे सांगून पुन्हा आधार नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला.
त्यानुसार अभिषेक गंबरे यानी पुन्हा दहिवडी व गोंदवले येथे आधार नोंदणी केली. यावेळीही त्यांना नोंदणीची पावती देण्यात आली. सहा वर्षांत वारंवार नोंदणी करूनही त्यांना आधार कार्ड मिळालेच नाही. जयश्री गंबरे व अभिषेक गंबरे यांनी आधार मिळाले नसल्याने ग्रामपंचायत ते प्रांताधिकारी कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता केली.
काही कार्यालयातून त्यांना बेंगलोर येथील आधार केंद्र्रावर चौकशी करण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या मुंबई-कुलाबा येथील क्षेत्रीय कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते मुंबई येथेही गेले; पण तेथे त्यांच्या तक्रारीला कोणीही दाद दिली नाही. अखेर हताश झालेल्या जयश्री गंबरे यांनी मुलाच्या आधारकार्डसाठी शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या तक्रार निवारणपोर्टलवरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, शासनाने अद्याप याची कोणतीही दखल घेतली नाही.