फलटण तालुक्यातील मृत्युदर वाढतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:22+5:302021-04-20T04:40:22+5:30
फलटण : शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, मृत्युदर वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

फलटण तालुक्यातील मृत्युदर वाढतोय...
फलटण : शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, मृत्युदर वाढत चालल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना उपचारांमध्ये उणिवा भासत असून, विविध औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाबाधितांचा जीव टांगणीला लागलेला आहे. एखाद्याला कोरोना झाल्यास त्याला बरे होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र फलटण तालुक्यात दिसत आहे.
फलटण तालुक्याला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चाललेला आहे. दररोज जवळपास पावणेदोनशेच्या घरात रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे मृत्यूची संख्याही वाढत चाललेली आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारामध्ये सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांची हेळसांड होत असून, वेळेवर चांगले उपचार मिळत नसल्याचे दिसून येत आहे. येथील सोयीसुविधांबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. एक रुग्णाने पळ काढला तरी याची माहिती रुग्णालयाला नव्हती, एवढा ढिसाळ कारभार येथे चालला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णालयाचे कामकाज चालविण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे. रुग्णांच्या सोयीसुविधांबद्दल नुकत्याच आमदार दीपक चव्हाण यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिलेले आहेत. उपजिल्हा रुग्णालय येथे सोयी-सुविधांची वानवा असल्याने तेथे सोयीसुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. फलटण शहरामध्ये जवळपास आठ कोरोना सेंटर्समध्ये तीनशे नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून, सर्व सेंटर्स फुल्ल झाले आहेत. बेड मिळविण्यासाठी कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.
फलटण तालुक्यात बेड न मिळाल्यास शेजारील तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बेडसाठी त्यांना पळापळ करावी लागत आहे. कसातरी बेड भेटला तर रेमेडीसिविर इंजेक्शन किंवा ऑक्सिजनसाठी नातेवाइकांना पळापळ करावी लागत आहे. कोरोना रुग्णाला उपचारासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याने या संघर्षातूनच त्याचे मानसिक खच्चीकरण होऊन मानसिक धक्क्यामुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत. शासकीय यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कामे करीत असली तरी त्यांना अनेक वेळा मर्यादा येत आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपापल्या पक्षामार्फत कोरोना रुग्णांना सोयीसुविधा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असताना असे होताना दिसत नाही.
फलटण शहरामध्ये अद्यापही अनेक जण विनामास्क फिरत असल्याने त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करणे गरजेचे आहे. प्रशासनानेही आपला कडक बाणा दाखविणे गरजेचे आहे. फलटण तालुक्याला दोन आमदार, एक खासदार, विधान परिषदचे सभापतिपद असूनही शेजारी बारामती तालुकाप्रमाणे कोविड रुग्णांसाठी सोयीसुविधा देण्यात सर्व जण कमी पडल्याचे जनतेतून मत व्यक्त होत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असून, अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना ज्यादा वेळ काम करावे लागत आहे. फलटण नगरपालिकेच्या आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत असला तरी या विभागातील सर्व कर्मचारी दिवसरात्र काम करताना दिसत आहे.
(चौकट)
सर्वत्र रांगाच रांगा..
फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय व नगरपालिका रुग्णालयामध्ये लस देण्याचे काम सुरू असून, तेथेही लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. कोविड टेस्ट करण्यासाठीही रांगा लागलेल्या दिसत आहेत. बाधित झालेल्या रुग्णांसाठी सिटीस्कॅन महत्त्वाचे असल्याने सिटीस्कॅन केंद्राबाहेरही रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या सर्व केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
(चौकट)
अबब १८ दिवसांत ५४ जणांचा मृत्यू...
फलटण तालुक्यात १ ते १८ एप्रिल या कालावधीत कोरोना झालेल्याचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १८ दिवसांत तब्बल ५४ जण मृत्युमुखी पडल्याने वाढता मृत्युदर चिंतेचा विषय होत चालला आहे. स्मशानभूमीत दररोज होत असलेले अंत्यसंस्कार पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवत आहे. मृत्युदर कमी होऊन योग्य उपचार मिळणेबाबत शासकीय यंत्रणेने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.