भोसेमध्ये दोनशेहून अधिक जणांना जेवणातून विषबाधा
By Admin | Updated: December 19, 2015 00:45 IST2015-12-19T00:45:00+5:302015-12-19T00:45:00+5:30
वास्तुशांतीच्या जेवण

भोसेमध्ये दोनशेहून अधिक जणांना जेवणातून विषबाधा
भोसे : भोसे (ता. मिरज) येथे शुक्रवारी वास्तुशांतीच्या जेवणातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. सायंकाळनंतर दुर्घटनेची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय पथक तातडीने गावात दाखल झाले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर मिरज येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भोसे येथे बाळासाहेब माळकर यांनी नवीन घर बांधले आहे. शुक्रवारी घराची वास्तुशांती होती. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह नातेवाईक, मित्रपरिवाराला निमंत्रण दिले होते. सुमारे १२०० जणांसाठी भोजन बनविण्यात आले होते. भोजनात बासुंदी-पुरीचा बेत होता. दुपारी बारा ते चार या वेळेत पंगती उठल्या. मात्र, जेवणानंतर लोकांना उलटी व पोटात मळमळण्याचा त्रास सुरू झाल्याने विषबाधा झाल्याचे लक्षात आले. सायंकाळनंतर विषबाधेचे रुग्ण वाढू लागले. सुरुवातीला पन्नास-साठच्या घरात असणारा विषबाधेच्या रुग्णांचा आकडा रात्री दोनशेच्या घरात गेला. ही संख्या केवळ गावातील रुग्णांची होती. परगावाहून आलेल्यांनाही विषबाधा झाल्याची भीती व्यक्त होत असून, त्यांची संख्या समजू शकली नाही.
सुरुवातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दाखल झाले. त्यानंतर तालुक्याच्या आरोग्य पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री आठच्या दरम्यान ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिका मागवण्यात आल्या. शिवाय मिरज येथून खासगी रुग्णवाहिकाही मागवण्यात आली. विषबाधा झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मिरजेच्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. विषबाधा कोणत्या कारणाने झाली, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. (वार्ताहर)