अवकाळीग्रस्तांच्या दु:खाकडे मंत्र्यांची पाठ

By Admin | Updated: December 16, 2014 00:13 IST2014-12-15T22:21:30+5:302014-12-16T00:13:51+5:30

शेतकऱ्यांचे अश्रू दिसलेच नाहीत : दिवाकर रावते सातारा दौरा सोडून नागपूरकडे रवाना

Minister's text to the misery of the deceased | अवकाळीग्रस्तांच्या दु:खाकडे मंत्र्यांची पाठ

अवकाळीग्रस्तांच्या दु:खाकडे मंत्र्यांची पाठ

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वारंवार अस्मानी संकट कोसळत असताना शासनपातळीवर सर्वत्रच गप्प ‘गार’ अशी परिस्थिती आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अवकाळी व गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भेटण्याचे निश्चित करूनही वेळेअभावी त्यांना त्यांचे अश्रू दिसले नाहीत. त्यामुळे कधी दुष्काळ तर कधी अस्मानी संकटाचा मुकाबला करणाऱ्या येथील शेतकऱ्यांबद्दलचा दुस्वास शासनाकडून संपणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव आणि खंडाळा या तालुक्यांना दोन-चार वर्षांतून दुष्काळाचा फटका बसत असतो. कधी-कधी हा दुष्काळ दोन-दोन वर्षे संपत नाही, अशी स्थिती असते. हे संकट असतानाच दोन वर्षांपासून आता अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण, अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका येथील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळे शेती करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन वर्षांच्या दुष्काळानंतर गेल्यावर्षी शेतकरी पावसामुळे समाधानी दिसला; पण त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये अवकाळी व गारपिटीचा तडाखा बसला. हा तडाखा भयंकर होता. कारण, अलीकडील काही वर्षांत उन्हाळ्याच्या दिवसात असा तडाखा येथील शेतकऱ्यांना माहीत नव्हता. या तडाख्यात द्राक्ष, डाळिंब बागा पुरत्या कोलमडून पडल्या. रानातील गहू अक्षरश: झोपला. वैरण पाण्यात तरंगू लागली. ती काळी पडल्यामुळे जनावरेही त्यांना तोंड लावत नव्हती. फेब्रुवारी-मार्चमधील तडाख्यात कोट्यवधींचे नुकसान झाले. पण, अपवाद वगळता कोणत्याही शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही.
माण तालुक्यातील शेनवडी परिसरात फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. तेथील शेतकऱ्यांना कवडीही मिळाली नाही, अशी तक्रार आजही तेथील शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ‘पावसाने झोडपले आणि राजाने मारले’ तर तक्रार करायची कोणाकडे, अशी परिस्थिती बळीराजाची आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात अवकाळीचा तडाखा बसला. गारपीट झाली मात्र, त्याकडे पाहण्यासही कोणी धजावले नाही.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी सांगली जिल्ह्यात जाऊन खानापूर व कडेगाव तालुक्यांत अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना भेटी दिल्या. तेथून आल्यावर ते सोमवारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार होते. त्यासाठी खंडाळा तालुक्यात नुकसान झालेले शेतकरी त्यांची वाट पाहत होते. पण, मंत्री रावते तिकडे फिरकलेच नाहीत. काम निघाल्याने ते नागपूर अधिवेशनाला गेल्याचे सांगण्यात आले. म्हणजे, येथील शेतकऱ्यांचे दु:ख हे प्रशासन तसेच शासनाला दिसलेच नाही. दुष्काळ व अस्मानीचा मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनाने ठामपणे उभे राहण्याची गरज असताना त्याकडे पाठ फिरवली जात आहे. याबद्दल शेतकऱ्यांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमचा कैवारी आहे का कोणी, असा टाहो त्यांना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)


मागील मदतही तुटपुंजी...
सुमारे दहा महिन्यांपूर्वी अस्मानी संकटात गारपीट होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देऊ केला असला तरी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा हात ‘हातचा राखून’च दिला होता. कारण, शेजारील सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २३० कोटी, सांगलीसाठी १६ कोटींची मदत देण्यात आली. त्या तुलनेत साताऱ्याला फक्त ५४ लाखांचाच निधी मिळाला होता. त्यामुळे कोटींच्या उड्डाणात सातारा मात्र ‘गप्प’गार ठरला होता.


फेब्रुवारी-मार्च महिन्यांत शेनवडी व परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ज्वारी, मका, कांदा, टोमॅटो तसेच द्राक्ष व डाळिंब बागांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून अद्याप रुपयाही मिळालेला नाही. शासन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-संजय खिलारी, सरपंच शेनवडी, ता. माण


अवकाळी पाऊस व गारपिटमुळे सांगली जिल्ह्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तेथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातही अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. मला तातडीने अधिवेशनासाठी नागपूरला यावे लागले. रात्रीच मी निघालो आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल शासनाकडे दिला आहे.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री


अतिशय कष्टाने यावर्षी पिके घेतली.भांडवलासाठी हजारो रुपये खर्च केले आणि आता अवकाळी पावसाने घात केला आहे. या अवकाळी पावसामध्ये सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. मोठे नुकसान झाले आहे; पण शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीव शासनाला नाही. मंत्री दौरा न करताच निघून गेले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल कोण घेणार की नाही, असा प्रश्न पडत आहे.
- बाळासाहेब धायगुडे, सुखेड, ता. खंडाळा

Web Title: Minister's text to the misery of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.