आरोपींच्या जामिनासाठी मंत्र्यांचे प्रयत्न : गोरे
By Admin | Updated: January 19, 2015 00:29 IST2015-01-19T00:04:07+5:302015-01-19T00:29:31+5:30
बोथे जिलेटिन स्फोट : पोलिसांना केले लक्ष्य

आरोपींच्या जामिनासाठी मंत्र्यांचे प्रयत्न : गोरे
सातारा : ‘बोथे (ता. माण) येथील डोंगरावरील जिलेटिन स्फोटप्रकरण संंबंधित कंपनी आर्थिक ताकदीच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीसही निष्पक्ष तपास करत नसून या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून राज्य सरकारमधील एक मंत्री प्रयत्न करत आहेत,’ असा गंभीर आरोप माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारची स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसून, या प्रकरणात आर्थिक तडजोड झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला. माण तालुक्यातील बोथे येथील ‘जंगला’ डोंगरावर दि. ९ रोजी झालेल्या जिलेटिन स्फोटात तीन ठार, तर पाच जखमी झाले. अंकुश गोरे वगळता कोणालाही अटक केली नसल्याच्या अनुषंगाने आ. गोरे यांनी पोलिसांवर तोफ डागली. याचवेळी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेलाही लक्ष्य केले.
आ. गोरे म्हणाले, ‘ज्यांचा येथील स्फोटाशी काडीमात्र संबंध नाही, त्यांना अटक करण्यात पोलिसांनी धन्यता मानली आहे. खऱ्या आरोपींना अटक झालीच पाहिजे. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर व्हावा म्हणून एक मंत्री प्रयत्न करत आहे. त्याचे नाव मी वेळ आल्यावर जाहीर करणार आहे,’ असे ते म्हणाले. तपास ‘सीआयडी’ किंवा ‘सीबीआय’कडे देण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)