साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी धरला ठेका अन् थोपडले दंड!
By सचिन काकडे | Updated: September 8, 2025 17:48 IST2025-09-08T17:48:32+5:302025-09-08T17:48:55+5:30
आगामी काळात राजकीय घडामोडी

साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी धरला ठेका अन् थोपडले दंड!
सचिन काकडे
सातारा : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेल्या एका कृतीने साताऱ्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर केवळ ठेका धरला नाही, तर दंड थोपटून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली भूमिका किती निर्णायक असेल, याचे संकेत दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमीच कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आघाडीवर असतात. मोठ्या कार्यक्रमातच नव्हे तर त्यांच्या सुख - दुःखातही ते सहभागी होतात. शनिवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत याच स्नेहाची आणि आपुलकीची झलक पाहायला मिळाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, राजपथ येथे नगरविकास आघाडीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी भव्य स्टेज उभारला होता. शिवेंद्रसिंहराजे आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्येक मंडळाचे उत्साहाने स्वागत करत होते.
एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे स्वतःला रोखू शकले नाहीत. सुरक्षेच्या लक्ष्मणरेषा ओलांडत ते थेट कार्यकर्त्यांच्या गर्दीत गेले. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात दोन्ही हात उंचावून ठेका धरला आणि तरुणांमध्ये एकच जल्लोष झाला. हा अविस्मरणीय क्षण तिथेच थांबला नाही. पुन्हा स्टेजवर परतल्यानंतर, त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देताना दंडही थोपटले. ही कृती फक्त नृत्याचा किंवा आनंदाचा अविष्कार नव्हती, तर त्यात एक राजकीय संदेश दडलेला होता. त्यांच्या या कृतीने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि त्यांनी शिट्ट्या व घोषणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मिरवणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीची उणीव शिवेंद्रसिंहराजेंनी भरून काढली. परंतु, या विसर्जन मिरवणुकीतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी मंडळांच्या स्वागतासाठी वेगवेगळे स्टेज उभारले होते. दोन्ही राजे एकत्र आले असले तरी त्यांच्या गटांमधील राजकीय ‘सीमारेषा’ यानिमित्त दिसून आल्या.
आगामी काळात राजकीय घडामोडी
शिवेंद्रसिंहराजे यांनी थोपटलेला हा दंड केवळ एका उत्सवातील क्षण नाही, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल आहे. हा एक प्रकारे साताऱ्याच्या राजकीय आखाड्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा स्थापित करण्याचा निर्धार आहे. हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडतील, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.