अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
By प्रमोद सुकरे | Updated: December 24, 2024 17:51 IST2024-12-24T17:50:25+5:302024-12-24T17:51:06+5:30
रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाही, मंत्री गोरे यांची बोचरी टीका

अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
कराड : सातारा जिल्ह्यात एकेकाळी एकाच पक्षाला सगळे आमदार, खासदार निवडून मिळत होते. मात्र असे असूनही जिल्ह्याला मंत्रीपद मिळत नव्हते अशी खंत होती. आज भाजपने मात्र जिल्ह्याला भरभरून दिले आहे असे मत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले. त्यावर तुम्हाला शरद पवारांनी अन्याय केला असे म्हणायचे आहे का? असे छेडले असता माझ्यावर नव्हे पण माझे वडील अभयसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांनी अन्याय केला. त्यांना नेहमीच मंत्रीपदापासून बाजूला ठेवले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे नुकसान तर झालेच पण जिल्ह्याचेही नुकसान झाले असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
मंत्री शिवेंद्रराजे भोसले कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींची उपस्थिती होती.
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, उदयनराजे भोसले हे तर आमचे खासदार आहेत. माझे आणि उदयनराजे यांचे वैयक्तिक कोणतेही भांडण नाही. पण नगरपालिकेच्या निवडणुकीला दोघांचेही कार्यकर्ते उमेदवारीसाठी हट्ट धरतात. त्यावेळी किरकोळ कुरबुरी होत राहतात. यापुढे आम्ही व्यवस्थित मिटवू.त्यामुळे दोघांच्या संघर्षाचा विषय नाही.
रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाही
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी तुमच्याकडेही तुमच्या मित्र पक्षाचे रामराजे नाईक निंबाळकर नेते आहेत. तुमचे आणि त्यांचेही मिटले असं समजायचं का? असे छेडले. त्यावर आता आम्ही संघर्ष करायचा टाळला आहे. पण रामराजे निंबाळकर हे कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहित नसेल आणि मलाही माहित नाही अशी बोचरी टीका गोरे यांनी केली. तर रामराजे म्हणजे फलटण नव्हे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना आवर्जून सांगितले.
मोठ्या भावांचे कराडवर लक्ष राहणार ना?
यावेळी कराडला मंत्रीपद नाही त्यामुळे तुम्ही थोरले भाऊ आहात. कराडवर व्यवस्थित लक्ष राहणार ना? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही मंत्र्यांना केला. त्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शंभर टक्के असे उत्तर देणे पसंत केले. पण मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र एका जिल्ह्याचे असे दोन भाग करणे योग्य नाही. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले आहे. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण दिली आहे. याची आठवण करुन दिली.