‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’ थोतांड
By Admin | Updated: January 7, 2015 23:54 IST2015-01-07T22:48:45+5:302015-01-07T23:54:28+5:30
‘अंनिस’चा दावा : साताऱ्यातील पत्रकार परिषदेत भांडाफोड केल्याचीही माहिती

‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन’ थोतांड
सातारा : ‘मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन हे विज्ञानाच्या नावावर चालणारे थोतांड आहे. याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भांडाफोड केली आहे,’ असा दावा ‘अंनिस’चे डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी केला
आहे.येथील पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ‘अंनिस’चे भगवान रणदिवे, उदय चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांत सातारा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुलांचे मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवितो, असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गाचे पेव फुटले आहे. मिड ब्रेन (मध्य मेंदू)चे उद्दिपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधूनही मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात, असा दावा मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो. विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. ‘अंनिस’ने या हातचलाखीचा भांडाफोड केला असल्याने पालकांनी या प्रकारापासून सावध राहावे.
डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांच्या मध्यभागी जी जागा राहते. त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हाताने दाब देऊन डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर या गोष्टी ओळखता येत नाहीत, हे प्रशांत पोतदार यांनी सप्रयोग करून दाखविले. आजूबाजूला अंधार करून किंवा मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांनाही मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाहीत,’ हे त्यांनी सांगितले.
मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनच्या नावाखाली चालणारी फसवणूक तातडीने बंद व्हावी म्हणून ‘अंनिस’ने राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यातील प्रकार थांबविण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले आहे. अशा बाबतीत फसवणूक झालेल्या पालकांनी ‘अंनिस’शी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले. (प्रतिनिधी)
भांडाफोडची चित्रफीत...
नाशिक येथील ओझर शाखेच्या ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी जाहीर कार्यक्रमात मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनच्या दाव्याचा भांडाफोड केल्याची चित्रफीत पत्रकार परिषदेत दाखविण्यात आली. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून कशा प्रकारे हातचलाखीने वस्तू ओळखता येतात, याचे ही प्रात्यक्षिक प्र्रशांत पोतदार यांनी दाखविले.