पारा 40 अंशांच्या वर.. धरणं 30 टक्क्यांच्या आत !
By Admin | Updated: April 9, 2016 00:15 IST2016-04-08T23:15:55+5:302016-04-09T00:15:46+5:30
पाणी साठा झपाट्यानं खाली : कसा जाणार उन्हाळा, हा एकच सवाल !

पारा 40 अंशांच्या वर.. धरणं 30 टक्क्यांच्या आत !
सागर गुजर -- सातारा --जिल्ह्यातल्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरल्याने हाहाकार माजला आहे. सूर्य अजूनही आग ओकत आहे. उन्हाचा पारा ४० अंशाच्या वर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस धरणांत उरलेले पाणीही आटण्याच्या मार्गावर आहे. धरणाचा पाणीसाठा ३० टक्क्यांहून कमी झाला आहे. जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे. धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एक दिवसाआड दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दुष्काळी भागाबरोबरच पश्चिमेकडील पाऊसमान चांगले असलेल्या प्रदेशातील लोकांनाही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. एप्रिल, मे महिन्यांत तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली तरी जुलै, आगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजडावा लागणार आहे.
बागायत क्षेत्र घटले
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात बागायती पिके घेतली जातात. उन्हाळ्यामुळे विहिरींतील पाणीसाठाही कमी झाला असल्याने बहुतांश ठिकाणी बागायत क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काकडी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांचे प्रमाणही घटले आहे.
नांगरट थांबल्या
रब्बी पिकांच्या काढणीनंतर जागोजागी नांगरटी केल्या जातात. जेवढे ऊन जास्त तेवढे नांगरट केलेल्या जमिनीला फायदा मोठा होतो. मात्र पावसाळ्यात तरी पाऊस पडेल का?, याबाबत साशंक असणाऱ्या शेतकऱ्यांनी अद्याप नांगरटीही थांबविल्या आहेत.
धरणांची सद्य:स्थिती
धरणक्षमताउपलब्ध पाणी (टीएमसी)
कोयना१०५३२
कण्हेर९.५९२.३८
धोम११.६९१.९६
उरमोडी९.६५५.४२
बलकवडी३.९६०.६५
तारळी५.८४२.८५
येरळवाडी०.६९निरंक