बैठकीतला आमीर अन् बांधावरचा सयाजी चर्चेत
By Admin | Updated: April 20, 2016 00:19 IST2016-04-19T23:27:24+5:302016-04-20T00:19:14+5:30
उन्हाची दाहकता मीडियावर : पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याबाबत सर्वच गु्रपवरून जनजागृती

बैठकीतला आमीर अन् बांधावरचा सयाजी चर्चेत
जगदीश कोष्टी -- सातारा -एरव्ही टाईमपास म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जात असलं तरी या आठवड्यात सोशल मीडियावर उन्हाची दाहकता, दुष्काळामुळे होत असलेले शेतकरी अन् जनावरांचे हाल दाखवत पाणी जपून वापरण्याचे आवाहन करणारे असंख्य मेसेजस् फिरले आहेत. सर्वाधिक चर्चा झाली ती मिरजहून लातूरला सोडलेली पाणी एक्स्प्रेसचे कौतुक आणि मंत्री महोदयांनी काढलेल्या सेल्फीची. विदर्भ, मराठवाड्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही दुष्काळाने डोके वर काढले आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. दुष्काळाचे ग्रामीण जनजीवनावर झालेले परिणाम अधोरेखीत करणारे, त्यावर भाष्य करणारे असंख्य मेसेज सोशल मीडियावरून व्हायलर होत आहेत. याच विषयावर भाष्य करणाऱ्या कविता, व्यंग्यचित्र, चारोळ्या फिरत आहेत. त्यातील अनेक मेसेज मित्रांना विचार करायला लावणारे, डोके सुन्न करणारे असतात. दुष्काळामुळं फाशीचा दोर जवळ केलेल्या धन्याचे पाय चाटणारा बैल हे व्यंग्यचित्र फिरत होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यावर कविताही केली. परंतु दुर्दैव्य असे की, शेकडो मंडळी हे मेसेज न वाचताच ते लाईक करत असतात. वास्तविक पाहता अशा मेसेजवर आपले मत, मतांतरे मांडणे, काही ठिकाणच्या समस्यांवर पर्याय सुचविणे काहीतरी प्रतिक्रिया देणे गरजेचे असते. त्यामुळे त्यावर वाद-प्रतिवाद होऊन छान पैकी पर्याय निघू शकला असता. दुष्काळाच्या बाबतीत असंख्य चर्चा गाजत असतानाच राजकारण्यांबाबत चिडही जाणवत होती. यामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकर्त्यांना सोडलेले नाही. ‘हेम चायवाला नहीं... पानीवाला चाहिए’ हे पंतप्रधान मोदींना सांगणारा शेतकरी, लातूरला ‘पाणी एक्स्प्रेस’ सोडल्यावर त्याठिकाणी हॅलिपॅडसाठी खर्च केलेले लाखो लिटर पाणी, दुष्काळी दौऱ्यात सेल्फी काढणाऱ्या राज्यातील मंत्री यांच्या वर्तनावर चिड व्यक्त करणाऱ्या संदेशांचा समावेश होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी होती. महामानवाला अभिवादन करणारे असंख्य छायाचित्रे, डॉ. बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार सर्वांना पे्ररणादायी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सातारा यांचे नाते सांगणारेही संदेश यामध्ये होते. या महामानवाला जगभर आदरांजली वाहन्यात आली. वेगवेगळ्या देशांमध्ये कशाप्रकारे कार्यक्रम आयोजित केले होते. हे सांगणारे छायाचित्रे सोशल मीडियावर फिरत होते. हे पाहून प्रत्येक सातारकरांचा ऊर अभिमानाने नक्कीच भरून येत होता. त्याचप्रमाणे भगवान महावीरांनी जगाला दिलेले संदेश महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र पोहोचविले जात होते. जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतीची रणधुमाळी या आठवड्यात भलतीच गाजली. त्यामुळे खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण तालुक्यांतील राजकीय नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या बातम्या या आठवड्यात सोशल मीडियावरून फिरत होत्या. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यावर आरोप केले. तसेच त्यांची गाडी पोलिस ठाण्यात नेली. त्यामुळे आमदार मकरंद पाटील यांना रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागली होती. काही कार्यकर्त्यांनी या घटनेच्या क्लिपिंग, फोटो काढून जाणूनबुजून त्या सर्वत्र फिरवल्या होत्या. यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या या निवडणुकीचा निकाल काय लागला, हे सर्वांना समजावे म्हणून या तालुक्यातील लोकांच्या ग्रुपवरून प्रत्येक फेरीचे निकाल फिरत होते.
अमिरचा दौरा...
पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप ’ स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सीनेअभिनेते अमिर खान दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने ही बैठक प्रचंड गोपनीय ठेवली होती. याठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृह परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. मात्र, प्रसारमाध्यमांना दूर ठेवून बैठक घेतली. या घटनेचा व्हॉट्सअॅपच्या असंख्य ग्रुपवरून निषेध करण्यात आला. हॅलिकॉप्टरमधून अवतारणाऱ्या आमिरच्या कार्पोरेट बैठकीची तुलना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे यांच्या चळवळीशीही जोडत अमिरच्या दौऱ्याचा तीव्र निषेध नोंदवला गेला.