मूठभरांमुळे वैद्यकीय पेशा बदनाम
By Admin | Updated: December 4, 2014 23:40 IST2014-12-04T23:15:26+5:302014-12-04T23:40:39+5:30
डॉक्टरांची भावना : ‘लोकमत’च्या मालिकेमुळे मोकळेपणाने व्यक्त केली साधक-बाधक मते

मूठभरांमुळे वैद्यकीय पेशा बदनाम
सातारा : वैद्यकीय पेशातील ‘कमिशनची साखळी’ कशी आणि का तयार होते, याबाबत या व्यवसायातील मंडळी भरभरून बोलतात. मात्र, ती असावी की नसावी याबाबत मतांतरे आढळतात. मूठभरांच्या गैरकृत्यांनी संपूर्ण वैद्यकीय पेशा बदनाम होऊ नये, अशी अपेक्षाही डॉक्टर व्यक्त करतात.
तातडीच्या शासकीय रुग्णवाहिका सेवेतील डॉक्टरला ‘रेफरल चार्जेस’ स्वीकारताना पकडल्यानंतर डॉक्टरी पेशाला बदनाम करणाऱ्या घटकांचा लेखाजोखा मांडणारी मालिका ‘लोकमत’मधून सुरू झाली. या प्रवासात अनेक डॉक्टरांनी ‘लोकमत’जवळ मोकळेपणाने मते नोंदविली. ‘कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट’ वैद्यकीय व्यवसायाला लागू केल्यानंतर तो ‘व्यवसाय’ ठरतो; पण अपेक्षा ‘सेवे’ची केली जाते. तशी अपेक्षा करायची झाल्यास करात सवलती, पालिकांकडून स्वस्तात जागा, शासकीय अनुदाने अशा गोष्टी मिळायला हव्यात, अशी अपेक्षा करणारे डॉक्टरही भेटले. ‘आजकाल कमिशन कुठे नाही,’ असा सवाल करून ‘सर्वच व्यवसायांचे कंपनीकरण होत असताना इतर व्यवसायांमधील कमिशनखोरीबद्दल कुणीच का बोलत नाही,’ असे विचारणारेही भेटले. अर्थात ‘रेफरल चार्जेस’चे समर्थन त्यांनीही केले नाही. वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा विषयही अनेकांनी छेडला. खासगी महाविद्यालयांत डोनेशन देऊन शिकणाऱ्यांचे काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. या खर्चाची वसुली तळागाळातल्या लोकांकडून केली जाते. केवळ ‘कट प्रॅक्टिस’च नव्हे, तर नियमांना बगल देऊन कमाईचे अनेक मार्ग शोधले जातात. ‘प्रिस्क्रिप्शन’वर जेनेरिक औषधांचीच नावे लिहावीत, हा नियम असताना महागडी औषधे सुचविली जातात. डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर चालवू नये, असा नियम असताना अनेक रुग्णालयांत ‘इनडोअर मेडिकल शॉप’ असते. ‘प्रिस्क्रिप्शन’वर मेडिकल दुकानाचा उल्लेख असू नये, हा नियम पाळला जात नाही. अशा गोष्टींमुळेच लोकांना संशय घेण्यास वाव राहतो आणि पेशा बदनाम होतो, अशी मांडणी काही डॉक्टरांनी केली. ‘कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट’ वैद्यकीय क्षेत्राला लागू केला गेला, तोही गैरप्रकार दिसून आले म्हणूनच, असे त्यांचे म्हणणे आहे. (लोकमत टीम)
काही दु:खद
लिहून दिलेले औषध विशिष्ट कंपनीचेच हवे यासाठी आग्रह धरला जातो. तेच ‘कॉम्बिनेशन’ असलेले दुसऱ्या कंपनीचे औषध ‘चालणार नाही’ असे सांगितले जाते.
मेडिकल दुकानाचे नाव प्रिस्क्रिप्शनवर चालणार नाही, हा नियम पाळला जात नाही.
‘काउन्सिलिंग’ या नावाखाली काही रुग्णालयांत रुग्णाची माहिती नव्हे, तर त्याच्या खिशाचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार उपचारांची दिशा ठरविली जाते.
काही सुखद
साताऱ्यातील एक पॅथॉलॉजी लॅब कोणालाही ‘रेफरल चार्ज’ देत नाही. तरीही जास्तीत जास्त रुग्णांना तेथेच पाठविले जाते. कारण या लॅबमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, कामाचा दर्जा आणि अचूकता आहे.
रेडिओलॉजीसारख्या अनेक शाखांतील संघटनांनी वेगवेगळ्या तपासण्यांचे दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अधिक दर आकारता येत नाहीत.
ग्रामीण भागातील अनेक डॉक्टरांचे ३० ते ४० टक्के रुग्ण उधारीवर उपचार घेतात.
त्यातील अनेकजण उधारी देतही नाहीत; तरी अनेक डॉक्टर रुग्णांची गरज ओळखून काम करतात.