वीस रुपयांचा मास्क पडतोय पाचशे रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:21+5:302021-03-23T04:41:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यातील सेव्हन स्टार इमारतीत विना मास्क वावरणाऱ्यांवर पालिकेच्या कोरोना पथकाकडून कारवाई करण्यात आली. पथकाने ...

वीस रुपयांचा मास्क पडतोय पाचशे रुपयांना
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्यातील सेव्हन स्टार इमारतीत विना मास्क वावरणाऱ्यांवर पालिकेच्या कोरोना पथकाकडून कारवाई करण्यात आली. पथकाने सात जणांवर कारवाई करून एकूण साडेतीन हजारांचा दंड वसूल केला.
सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठ दिवसांत दीड हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कचा वापर न करणाऱ्या व फिजिकल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. त्यानुसार कोरोना विभाग प्रमुख प्रणव पवार व अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने सोमवारी शहरात मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.
शहरातील सेव्हन स्टार इमारतीतील दुकानांची पथकाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी मास्क न लावणाऱ्या सात जणांवर प्रति ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत एकूण साडेतीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईवेळी काही नागरिकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांचा विरोध झुगारून पथकाकडून कारवाई करण्यात आली. कारवाईच्या धास्तीने अनेक जण मास्क लावताना दिसून आले. मंगळवारी देखील ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रणव पवार यांनी दिली.
(चौकट)
..तर पाचशेची नोट खिशात ठेवा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही अनेक जण मास्कचा वापर करीत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रति ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. वीस रुपयांच्या मास्कसाठी नागरिकांना चक्क ५०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना खिशात पाचशे रुपयांची नोट ठेवूनच आता घराबाहेर पडावे लागणार आहे.