मांढरदेवला कार खाक
By Admin | Updated: January 12, 2015 01:31 IST2015-01-12T01:14:11+5:302015-01-12T01:31:28+5:30
यात्रेनंतरही गर्दी : तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

मांढरदेवला कार खाक
मांढरदेव : मांढरदेव येथील श्री काळूबाईच्या दर्शनासाठी येत असलेल्या भाविकाच्या इंडिका कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, यात्रेनंतरचा पहिला रविवार असल्याने सुमारे तीन लाख भाविक दर्शनासाठी मांढरगडावर दाखल झाले.
कोथरूड (पुणे) येथील भाविक हुलावळे हे आपल्या इंडिका कारमधून (एमएच १२ सीटी ८६७७) मांढरदेवला येत होते. भोर-मांढरदेव घाट चढल्यानंतर अंबाड खिंडीजवळ गाडीने अचानक पेट घेतला. कोचळेवाडी चेकपोस्टपासून एक किलोमीटर अंतरावर व मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
गाडीत चार व्यक्ती होत्या. गाडीतून धूर येऊ लागताच गाडीतील सर्व व्यक्ती बाहेर आल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. धुरापाठोपाठ गाडीने पेट घेतला. ही आग एवढी प्रचंड होती की संपूर्ण गाडी जळून खाक झाली. रस्त्यावरच गाडीने पेट घेतल्याने व आज दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्याने भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे या रस्त्यावरील वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती.
दरम्यान, आज मुख्य यात्रेनंतरचा पहिला रविवार असल्याने देवीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे तीन लाख भाविकांनी काळूबाईचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या
होत्या. (वार्ताहर)