मर्द मावळ्यांचे सह्याद्री कडे इंग्रजाळलेलेच!
By Admin | Updated: December 16, 2014 00:12 IST2014-12-15T22:30:56+5:302014-12-16T00:12:24+5:30
महाबळेश्वर पॉर्इंटस् : ब्रिटिशकालीन नावे बदलण्याच्या हालचाली गतिमान--...गर्जा महाराष्ट्र माझा

मर्द मावळ्यांचे सह्याद्री कडे इंग्रजाळलेलेच!
सातारा/महाबळेश्वर : इंग्रजांचे राज्य खालसा होऊन ६६ वर्षे उलटली तरीही त्यांच्या नावाचा टेंभा महाराष्ट्रातील जनतेच्या नाकावर टिच्चून मिरविला जातोय. महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील बहुतांश ‘पॉर्इंटस्’वर आजही इंग्रजी अधिकाऱ्यांची नावे दिमाखात मिरविली जाताहेत. राज्यात भाजप-सेनेचे सरकार येताच या पॉर्इंटस्च्या नामांतरासाठी काहीजणांनी आता पुढाकार घेतला असून, त्यादृष्टीने गतिमान हालचालीही सुरू झाल्या आहेत.
महाबळेश्वर शहराचा उल्लेख पुराणात पाहावयास मिळतो. पूर्वीचे क्षेत्र महाबळेश्वर यालाच आज आपण ‘महाबळेश्वर’ या नावाने ओळखतो. महाबळेश्वरचे कागदोपत्री नाव ‘माल्कमपेठ’ असे होते. आजही काही जुने लोक महाबळेश्वरला ‘नहर’ या नावाने संबोधतात. देवगिरीच्या यादवांच्या राज्यात पूर्वी या भागाचा समावेश होता. सन १२१० मध्ये राजा सिंघल यादवने महाबळेश्वरला भेट दिली होती. त्यांनतर जावळीचे मोरे यांच्या जहागिरीत हा भूभाग आला. मोरेंचा पाडाव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. काळानुसार १९२८ पर्यंत हा भाग सातारच्या महाराजांच्या जहागिरीत होता. यावेळी इंग्रजांची खंडाळा पेटा देऊन त्या बदल्यात आरोग्य धाम (सेनिटोरियम) करिता हा भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला.
माल्कमपेठची (महाबळेश्वर) स्थापना झाल्यानंतर डॉ. मरे यांनी महाबळेश्वरच्या विकासातील पहिला रस्ता माल्कमपेठ ते एल्फिस्टन पॉर्इंटपर्यंत तयार केला. त्यावेळी मुंबई प्रांताचे गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन होते. त्यांचेच नाव याला देण्यात आले.
महाबळेश्वरच्या निर्मितीनंतर या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक पॉर्इंट शोधून काढले व विकसित केले. त्यामध्ये मारझोरी, मंकी, सावित्री, कॅसल रॉक, हॉनटिंग, एको, माल्कम, विंडो, टायगर स्प्रिंग, आर्थरसीट, लॉडविक, कॅनोट पीक, विल्सन, केट्स, बॅबिग्टन असे अनेक पॉर्इंटस् आपणास आजही पाहावयास मिळतात. ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी या पॉर्इंटचा शोध लावला त्यांच्याच नावाने हे पॉर्इंट ओळखले जातात, मात्र सह्याद्रीच्या या कडेकपारीत ज्यांनी सुराज्यासाठी प्राणाची आहुती दिली त्या एकाही मराठी मावळा अथवा सरदाराचे नाव कोठेच दिसत नाही.
महाबळेश्वर शहर व परिसरात एकूण २७ पॉर्इंटस् आहेत. यामध्ये दोन मंदिरे देखील आहेत. वनविभागाद्वारे या सर्व पॉर्इंटस्ची देखभाल केली जाते. सर्वाधिक उंच ठिकाणावर असणारा विल्सन पॉर्इंट महाबळेश्वर शहराच्या पूर्व दिशेस आहे. बॅबिग्टन पॉर्इंटच्या खाली असणाऱ्या खोल दरीमध्ये चिनी कैद्यांना ठेवले जात होते. याच पॉर्इंट परिसरात हेलन, नॉर्थ कोट, गवळणी पॉर्इंट, चोरांची गुहा व ब्लू-व्हॅली असे पॉर्इंट पाहावयास मिळतात.
जनरल लॉडविक यांनी ‘लॉडविक’ या पॉर्इंटचा शोध लावला. म्हणून या पॉर्इंटला त्याचेच नाव देण्यात आले. या ठिकाणी असणाऱ्या स्तंभावर १८२७ अशी सनावळी कोरलेली आहे. समोरचा डोंगर हत्तीच्या मानेसारखा दिसतोे. यालाच ‘हत्तीचा माथा’ असे म्हटले जाते.
केट्स पॉर्इंट या ठिकाणाला ‘नाके खिंड’ असेही संबोधले जाते. शिवाजी महाराजांच्या काळात या ठिकाणी शत्रूला अडविण्यात येत असे. ब्रिटिश कालखंडात मुंबईचे गव्हर्नर सर जॉन माल्कम यांच्या कन्येला हे ठिकाण फार आवडले. तिच्या ‘केट’ या नावावरूनच ‘केट्स पॉर्इंट’ असे नाव देण्यात आले. बाजूलाच ‘निडल होल’ पॉर्इंट आहे.
महाबळेश्वरमधील ‘आॅर्थरसीट पॉर्इंट’ पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र आहे. ब्रिटिश अधिकारी आॅथर मॅलेट यांच्या नावाने हा पॉर्इंट ओळखला जातो. या पॉर्इंटवरून ‘विंडो पॉर्इंट’ तसेच उजव्या हाताला ‘ब्रह्मारण्य’ तर डाव्या हाताला ‘सावित्रीचे खोरे’ व खोल कड्यांचे सुळके दिसतात, मात्र गेल्या ६६ वर्षांपूर्वी इंग्रजांचे राज्य खालसा होऊनही त्यांची नावे तशीच राहिली. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर या कड्यांच्या नामांतराचा विषय ऐरणीवर येऊ लागला आहे. (प्रतिनिधी)
पाहुणचार प्रतापसिंहांचा... नाव माल्कमचे!
कर्नल जॉन ब्रीग्ज नामक ब्रिटीश नागरिकाने सन १८२३ साली महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणास भेट दिली. येथील निरोगी, प्रफुल्लीत वातावरण तसेच निसर्ग सौंदर्य पाहून तो अतिशय प्रभावित झाला. सातारचे तत्कालीन श्रीमंत राजा यांना येथे बॉम्बे प्रेसिडन्सी यांच्या हवापालटासाठी विश्रामगृह बांधण्याची परवानगी त्याने मागितली. त्यानंतर महाबळेश्वरला पोहचण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या प्रतीचा रस्ता बनविण्यात आला. दि. २७ एप्रिल १८२८ रोजी बॉम्बे प्रेसीडन्सीचे तत्कालीन गर्व्हनर सर जॉन मालकम हे बानकोट व महाड मार्गे महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. सातारचे राजा प्रतापसिंह व तत्कालीन लेफ्टनंट कर्नल रॉर्बटसन यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था येथील शिंदोळा पार्क या बंगल्यात केली. राजांचे राजेशाही आदरातिथ्य व महाबळेश्वरचे प्रफुल्लीत वातावरण यामुळे सर जॉन मालकम प्रभावित झाले. हा महाबळेश्वरचा तात्पुरता मुक्काम एवढा प्रभावी ठरला की त्यांनी लागलीच महाबळेश्वरच्या परिपूर्ण सर्व्हेची आॅर्डर काढली. या ठिकाणी माउंट शारलोट नावाचे पहिले शासकीय विश्रामगृह बांधले. नंतरच्या काळात ही इमारत माऊंट मालकम नावाने ओळखली जाऊ लागली. ज्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजांनी मालकम यांना महाबळेश्वर बोलविले, त्यांचे नाव या ठिकाणी कुठेच नाही.