सातारा : जागतिक मराठी संमेलनाचा उद्देश केवळ साहित्यिकांचा मेळा नाही. साहित्याने मनाचे आणि बुद्धीचे पोषण होते. परंतु, पोटाचा प्रश्न सुटेल असे नाही. मराठी माणसाने व्यापारी उद्योग, कला-कौशल्य क्षेत्रात प्रवेश केला पाहिजे. जागतिक संमेलनाच्या व्यासपीठावर त्या माहितीचे व ज्ञानाचे आदान प्रदान केले पाहिजे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था सातारा आयोजित जागतिक मराठी अकादमी संमेलनात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंखे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष कवी रामदास फुटाणे, खा. रामशेठ ठाकूर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख, माजी मंत्री उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरु ज्ञानदेव म्हस्के, अभिनेते सयाजी शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, रयतचे व्हा. चेअरमन, भगिरथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.शरद पवार म्हणाले, सातारा ही पराक्रमांची, सुधारकांची, स्वातंत्र्यसैनिकांची अन् साहित्यिकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. याच भूमीत जागतिक मराठी संमेलन होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. आता शिवछत्रपतींची दृष्टी घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. नव्या पिढीमध्ये व्यापारी आणि उद्यम वृत्ती वाढीस लागली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० एकरावर कृषीवर आधारित उद्योग उभे करण्याची संकल्पना हाती घेतली होती. ती मार्गी लागावी.आ. ह. साळुंखे म्हणाले, आमच्या पिढीतली मुलं-मुली गोरगरीब आई-वडिलांच्या पोटी जन्माला येऊन धडपड करून शिकलो. आता मात्र मुलांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं अवघड झालं आहे. त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल, याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. शंभर टक्के लोकांना स्वतःची शंभर टक्के गुणवत्ता फुलवण्याची संधी मिळू शकते, तोच समाज आदर्श समाज म्हणता येईल. आदिवासी, ग्रामीण, भटके विमुक्त आदी समाजातील मुलांना घरातील भाषा आणि शाळेत प्रमाण भाषा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या बोलींमधून काही महत्त्वाचे निवडक शब्द प्रमाण मराठीत स्वीकारून मान्यता दिली तर प्रमाण मराठीची शुद्धता कमी होणार नाही तर अधिक समृद्ध होईल.आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच अधिवेशनात महाराष्ट्र जोडण्याची घोषणा केली होती. सर्व पक्षांच्या नेत्यांशी, वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांशी प्रामाणिकपणे संवाद व समन्वय ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, एकजण रोज सकाळी ९ वाजता शब्ददारिद्र्य घेऊन सर्वांसमोर येतोय. त्याला आवरायला हवे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
पवार यांचा शाळेतही अन् राजकारणातही आदर्शमी शिकलो त्या मराठा मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. माझ्या राजकीय कारकिर्दीचे कुलगुरूदेखील शरद पवारच होते, असे उदय सामंत यांनी म्हटले. मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री शरद पवार यांनीच बनवले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर मराठी भाषा विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते शाळेत व राजकारणात आदर्श आहेत.