मराठा समाज आरक्षणाचा एल्गार पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातून!
By Admin | Updated: July 29, 2016 23:19 IST2016-07-29T22:44:11+5:302016-07-29T23:19:11+5:30
उद्या आयोजन : नीलेश राणेंची पहिली सभा

मराठा समाज आरक्षणाचा एल्गार पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्यातून!
सातारा : मराठा समाजातील दुर्लक्षित घटकांच्या हक्कासाठी आवश्यक असलेल्या मराठा समाज आरक्षणाचा एल्गार आता पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. माजी खासदार नीलेश राणे यांची पहिली सभा रविवार, दि. ३१ रोजी सायंकाळी चार वाजता साताऱ्यातील स्वराज्य सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे.
काँग्रेस आघाडी शासनाने मराठा समाजाला आरक्षण देता यावे यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला होता. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अथक मेहनत घेऊन सर्वंकष अभ्यास करून मराठा समाजाला २० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. ती करताना अन्य समाजाला असणाऱ्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. या अहवालातील शिफारशीचा आधार घेत आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय न्यायालयात टिकावा यादृष्टीने विधी आणि न्याय विभाग तसेच अॅड. जनरल यांचाही कायदेशीर सल्ला घेण्यात आला होता. निर्णयाचा हा मसुदा प्रत्येक निकषावर टिकेल असा तयार करण्यात आला होता. मात्र, त्याला न्यायालयात आव्हान दिल्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
राज्य सरकारने त्याविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे घोषित केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर जनजागृती करून या मागणीसाठी आग्रह धरण्याच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या दौऱ्याचा शुभारंभ दि. २४ एप्रिलला रत्नागिरी येथून झाला. आता हा दौरा पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. पहिली सभा रविवार, दि. ३१ जुलै रोजी साताऱ्यात होणार आहे. यावेळी खासदार नीलेश राणे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)