सहा मिनिट वाॅक टेस्टचा अनेकांना मिळतोय आधार....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:43+5:302021-04-20T04:39:43+5:30
वडूज : कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना जिल्ह्यात बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा यासह अन्य कारणांमुळे ...

सहा मिनिट वाॅक टेस्टचा अनेकांना मिळतोय आधार....
वडूज : कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना जिल्ह्यात बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा यासह अन्य कारणांमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सहा मिनिटे वाॅक टेस्ट ही आरोग्याची चाचणी सध्या नागरिकांना मोठा दिलासा देत आहे.
घरच्या घरी ही आरोग्याची चाचणी जिल्ह्यात अनेकजण करीत आहेत. तर रुग्णालयामध्येही रुग्णांकडूनही ही चाचणी करून घेण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून यासंदर्भात सातत्याने जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ही घरच्या घरी आपल्या फुप्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का नाही, याची तपासणीसाठी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही आरोग्य विभागाकडून केले जात आहे. यासाठी सहा मिनिटे चालण्याची ही एक सोपी पद्धत आहे. यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणून घेण्यास मदत करते. यामुळे योग्यवेळी रुग्णालयात उपचार घेणे सोपे होते.
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची नियमित चाचणी केली जात आहे. यामुळे प्रत्येक रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची माहिती मिळणे सोपे झाले आहे. ताप, सर्दी, खोकला किंवा कोरोनाची इतर लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी किंवा घरगुती विलगीकरणात असलेल्यांनाही ही चाचणी करता येते. चाचणी कुठल्याही कडक जमिनीच्या पृष्ठभागावर करावी. चाचणी करताना जमीन चढ-उतार किंवा पायऱ्याची नसावी, यांची काळजी घ्यावी.
(चौकट)
....तर काळजी घ्या
रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती. त्या पातळीत तीन टक्क्यांपेक्षाने कमी होत असेल तर सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्यासारखे होत असेल तर ऑक्सिजन कमी पडतो, असे समजून जवळच्या रुग्णालयात किंवा डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
(चौकट)
अशी करा चाचणी...
आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करा. त्यानंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात पायीच स्टाॅपवाॅच लावून सहा मिनिटे फिरा. फिरताना अतिवेगाने अथवा अतिस्थिर फिरू नका. सहा मिनिटे सतत स्थिर गतीने चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.
---------------------------------------
असे लागणार साहित्य
घड्याळ, स्टाॅपवाॅच, (मोबाईल फोन ) आणि पल्स ऑक्सिमीटर
चौकट..
काळजी करू नका
सहा मिनिटे चालल्यानंतर ही रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर तब्येत अगदी ठीक आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी एक किंवा दोन टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करू नका. दिवसातून दोनवेळा चाचणी केल्यास ऑक्सिजन लेव्हल समजणे सोपे होते.
कोट..
सार्वजनिक आरोग्य विभागाने सहा मिनिट वाॅक टेस्टसाठी जनजागृती सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये यासाठी जनजागृती केली जात आहे. कोविड रुग्णालयातील रुग्णांकडून ती करवून घेतली जात आहे. आपल्या फुप्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे की नाही. याचे परीक्षण करण्यासाठी नागरिकांनी ही चाचणी घरच्या घरी केल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकेल.
-डाॅ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव