मानाचा झेंडा मिरवणुकीने आज प्रारंभ
By Admin | Updated: December 16, 2014 00:13 IST2014-12-15T22:23:51+5:302014-12-16T00:13:06+5:30
पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रा दि. २६ पर्यंत चालणार

मानाचा झेंडा मिरवणुकीने आज प्रारंभ
पुसेगाव : ‘लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त वार्षिक यात्रा दि. १६ ते दि. २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी नऊ वाजता मानाचा झेंडा मिरवणुकीने श्री सेवागिरी यात्रेस प्रारंभ होणार आहे,’ अशी माहिती श्री सेवागिरी देवस्थान मठाधिपती सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
दि. १६ रोजी मंदिरामध्ये श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस अभिषेक व विधिवत पूजा, आरती करण्यात येणार आहे. मानाच्या पालखीत श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची प्रतिष्ठापना मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अॅड. विजयराव जाधव व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात येईल. त्यानंतर मानाचा झेंडा व पालखीची सवाद्य गावातून मिरवणूक काढून मानाच्या झेंड्याची यात्रास्थळावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत येथील ग्रामस्थ, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी झांजपथके, लेझीम व बँड पथके सहभागी होणार आहेत. यात्रास्थळालगत शेतकऱ्यांनी शेतात बांधलेल्या पाण्याच्या टाक्या तसेच पुसेगाव ग्रामपंचायतीने जलकुंभ याद्वारे मुबलक पाणी यात्रेकरू व बैलबाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जनावरे इतरत्र न बांधता ट्रस्टने बैलबाजारासाठी नियोजित केलेल्या जागेवरच बांधून ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)
व्यावसायिकांचे पुसेगावात आगमन
दि. १६ ते दि. २६ डिसेंबर या कालवधीत श्री सेवागिरी महाराजांची यात्रा भरणार आहे. दहा दिवस भरणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने, स्वेटर, कलावस्तू, पाळणे, चित्रपटगृहे, गृहोपयोगी साहित्य, जिलेबी, मिठाई, खेळणी, मनोरंजन व विविध व्यावसायिकांचे आगमन झाले आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रास्थळावर व परिसरात अत्यंत शिस्तबद्धपणे विविध स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे.