- माणिक डोंगरेमलकापूर - भरधाव कारची दुभाजकाला धडक होऊन झालेल्या अपघातात कार महार्गावरच पलटी झाली. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूरू महामार्गाच्या पुणे-कोल्हापूर लेनवर रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. चालक महादेव अशोक नगरकर (वय ३५ राहणार महाड, जिल्हा रायगड), श्रेया प्रदीप पारेख (वय २८) अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार (क्रमांक एम एच १२ एस क्यू ३७३६) मधून चालकासह एक महिला असे दोघे पुण्याकडून कोल्हापूर दिशेला निघाले होते. पुणे-बंगळूरू महामार्गावर खोडशी ता कराड गावच्या हद्दीत आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्यान महामार्गाच्या कामासाठी ठेवलेल्या दुभाजकाला कारची जोरदार धडक झाली. या धडकेत कार महामार्गावरच पलटी झाली. या अपघातात कारमधील चालकासह महिला गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होतास आसपासच्या नागरिकांसह वाहनधारकांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती महामार्ग पोलीसांसह देखभाल विभाग व कराड शहर पोलिसांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मुळीक यांच्यासह महामार्ग पोलीस व महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघाताचा पंचनामा करून पलटी झालेली कार बाजूला घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.