मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 15:40 IST2017-11-23T15:39:59+5:302017-11-23T15:40:10+5:30
मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे.

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य मार्गावरील पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालकांची कसरत, हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
मायणी- मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या मायणी गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या दोन्ही बाजूंच्या पुलाची अतिशय बिकट अवस्था झाली असून, पश्चिमेकडील पुलाच्या मध्यभागी व कडेला दोन मोठी भगदाडे पडले आहे. याच पुलावरून रोज हजारो विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा प्रवास जीव मुठीत धरून करीत आहेत. तर वाहन चालकांनाही वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मायणी गाव व चांदणी चौकाला जोडणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. तर त्याच्याच शेजारी उजव्या बाजूस गवतामध्ये (रक्षक दगडाजवळ) दुसरे एक भगदाड पडले आहे. तसेच पुलावर असंख्य लहान-मोठे खड्डेही पडलेले आहेत. या पुलाची उंची व रुंदी कमी आहे, तसेच संरक्षण जाळी नाही व पादचारी मार्गही नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूस प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी येणारे हजारो विद्यार्थी याच पुलाचा वापर करीत आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
गावातून मुख्य चौक व विटा, सांगली, वडूज, सातारा, कऱ्हाड व पुणे मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालकांना याच पुलाचा आधार घ्यावा लागतो. याच पुलावर असंख्य खड्डे त्यातही पडलेली मोठी भगदाडे अरुंद व कमी उंचीचा पूल, रक्षक दगडावरती वाढलेली झुडपे व शिक्षणासाठी चालत असलेले हजारो विद्यार्थी व ग्रामस्थ त्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी याच मार्गावरील म्हणजे गावाच्या पूर्व बाजूच्या पुलाचा संरक्षण कट्टा पडला आहे. त्याकडे संबंधित बांधकाम विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मायणी पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी लाल रिबीन लावून सामाजिक बांधिलकीचे दर्शन संपूर्ण मायणीकरांना घडविले होते. तरी बांधकाम विभाग झोपलेलाच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.